संगमनेर l झुंजार न्यूज
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा गावोगावी सायकलवरून प्रचार करणाऱ्या नवनाथ पावसे व सागर पावसे यांना कवठे मलकापूर परिसरामध्ये महायुतीच्या दहा – बारा गुंडांनी मारहाण केली असून त्यांना तातडीने साकुर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हात पायाची मोडतोड झाली असून पुढील उपचाराकरता संगमनेरला आणले आहे.

हिवरगाव पावसा येथील नवनाथ लहानु पावसे व सागर किसन पावसे हे मागील दहा दिवसापासून संगमनेर तालुक्यात सायकलवर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचा प्रचार करत आहेत. काल साकुर येथे सभा असल्याने त्यांनी दिवसभर पठार भागातील अनेक गावांमधून सायकलवरून आमदार थोरात यांचा प्रचार केला. हा विशेष प्रचार लक्षवेधी ठरला असल्याने महायुतीच्या अनेक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध राग निर्माण झाला. कवठे मलकापूर वरून साकुर येथील सभेला येत असताना वाटेमध्ये महायुतीच्या विशेषता शिंदे गटाच्या दहा – बारा गुंडांनी त्यांना अडवले व तुम्ही प्रचार करू नका अशी दमदाटी दिली. यावर नवनाथ व सागर यांनी आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत आम्ही प्रचार करणार असे सांगितल्यानंतर या गुंडांनी त्यांना मारहाण केली. काठीने मारहाण केल्यानंतर त्यांच्या पाठीवर वळ उठले तर नवनाथ चा हात मोडला. तर सागरला जबर मारहाण झाली. ही बातमी समजतात शंकर पाटील खेमनर व इंद्रजीत खेमनर यांनी तातडीने घटनास्थळाला भेट देऊन या दोघांनाही साकुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणले.

यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व डॉ.जयश्रीताई थोरात यांनी या कार्यकर्त्यांना भेट दिली. यावेळी आमदार थोरात म्हणाले की राहता तालुक्यातील दहशत संगमनेर तालुक्यात चालणार नाही. येथे सुसंस्कृत वातावरण आहे. निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात होते. मात्र कार्यकर्त्यांना एकटे गाठून मारहाण करायची ही संस्कृती खपवून घेणार नाही. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करावी. अन्यथा आम्ही पुरा बंदोबस्त करू. प्रशासनाचा कोणताही धाक राहिला नसून गुंडांना पालकमंत्री प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे अशा घटना घडत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

यावेळी उपचारार्थ त्यांना संगमनेर मधील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ.जयश्रीताई थोरात, शंकर पाटील खेमनर, इंद्रजीत खेमनर, डॉ प्रमोद पावसे, डॉ संदीप पावसे आदींसह साकुर व हिवरगाव परिसरातील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साकुरच्या सभेत निषेध
काँग्रेस कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा साकुर येथे झालेल्या भव्य सभेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी निषेध केला असून मारहाण करणाऱ्या प्रवृत्तीला प्रशासनाने तातडीने अटक करावी. या तालुक्यामध्ये दडपशाही आणि गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
