साई संस्थानमध्ये भाजपा , शिंदे पवार गटासह रिपब्लिकन पक्षाला संधी मिळावी ही मागणी
आश्वी । झुंजार न्यूज
देशातील एक अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेला आता वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात हे नवीन मंडळ अस्तित्वात येण्याची शक्यता असून चौडी येथे होत असलेल्या मंत्रीमंडळ बैठकीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. गेल्या काही काळापासून रखडलेल्या विकासकामांना त्यामुळे गती मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सन २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, देशविदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांची संभाव्य गर्दी शिर्डीकडे वळू शकते. त्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटार यंत्रणा, पार्किंग, लाईटिंग, निवास व्यवस्था या अत्यावश्यक सुविधा विकसित करणे गरजेचे आहे. शासनाकडून पूर्वतयारीचा आराखडा तयार करण्यात आला असला, तरी त्यात शिर्डीचा समावेश नाही. त्यामुळेच साई संस्थानच्या पूर्ण वेळ विश्वस्त मंडळाची आवश्यकता अधिक तीव्रतेने जाणवते.

सध्या संस्थानचा कारभार त्रिसदस्यीय समितीकडे आहे, मात्र उच्च न्यायालयाने धोरणात्मक निर्णय घेण्यास त्यांच्या अधिकारांवर मर्यादा घातल्या आहेत. त्यामुळे प्रमुख विकासकामे – जसे की रिंगरोड, पार्किंग प्रकल्प, गार्डन आरक्षण आणि भू-संपादन – हे सर्व थांबले आहेत. शिर्डी नगरपरिषदेच्या निधीअभावी ही कामं साई संस्थानवर अवलंबून आहेत, मात्र अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विश्वस्त मंडळालाच आहे.

नवीन मंडळात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांचे वर्चस्व असलेले २१ सदस्य असणार आहेत. मात्र महायुतीच्या फार्मुला नुसार रिपब्लिकन ( आठवले ) पक्षाचे कार्यकर्ते इच्छूक असून शिर्डीसह अहिल्यानगर जिल्हयात रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे मोठे जाळे असल्याने २१ सदस्यापैकी कमी – कमी २ जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत .यामध्ये डॉक्टर, आर्किटेक्ट, वकील, पदवीधर अशा अनुभवी तज्ज्ञांचा समावेश अनिवार्य आहे. त्याशिवाय सात सदस्य हे अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यामुळे शिर्डीसह संपूर्ण जिल्ह्यात ‘फिल्डिंग’ लावण्याची चुरस सुरु झाली आहे.


शिर्डी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनाची पूर्ती व्हावी महामंडळासह शिर्डी विश्वस्त मंडळात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल हे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी दिलेल्या शब्दानुसार जिल्हयातील कार्यकर्त्याला साई संस्थान विश्वस्तामध्ये संधी मिळेल असा विश्वास रिपब्लिकन राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे व्यक्त केला .
