आश्वी । झुंजार न्यूज
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्यावरून आश्वी खुर्द येथील शाळा व्यवस्थापन समितीने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. समितीचे सदस्य सागर दिनकर भडकवाड यांनी ई-मेलद्वारे हे निवेदन पाठवले असून, शैक्षणिक वर्षाच्या मध्यात होणाऱ्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया जुलै २०२५ मध्ये लागू करण्यात आली आहे. मात्र, शैक्षणिक वर्षाचा बराचसा काळ लोटल्यानंतर अचानक होणाऱ्या या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक अस्वस्थता निर्माण होत असून, त्यांच्या अभ्यासावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. निवेदनानुसार, इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षकांशी एक भावनिक नाते तयार झालेले असते. अचानक शिक्षक बदलल्यास हे नाते तुटून त्याचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर आणि पर्यायाने शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे, बदल्यांचे आदेश योग्य असले तरी, त्यांची अंमलबजावणी मे २०२६ नंतर केल्यास विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही दिलासा मिळेल, असे सागर भडकवाड यांनी म्हटले आहे. या मागणीला अनेक पालकांनीही पाठिंबा दर्शवला आहे.
शैक्षणिक वर्षाच्या मध्यात अशा बदल्या झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होईल, अशी भीती पालक व्यक्त करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील काही तज्ज्ञांच्या मते, ही बदली प्रक्रिया शिक्षकांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करत असून, सध्याची वेळ बदल्यांसाठी योग्य नाही.
आश्वी खुर्द येथील शाळा व्यवस्थापन समितीने आता मुख्यमंत्री या निवेदनाची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत पार पडावे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला बाधा पोहोचू नये, यासाठी शासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
