को-हाळे गावातील हॉटेल राजनंदिनी शेजारी राहणारे 60 वर्षीय परसराम भागाजी वैदय यांच्या 30 मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी परसराम वैदय हे मेंढीपालनाचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्यांनी आपल्या 150 मेंढ्या घरासमोरील तार कपाऊंडमध्ये डांबून ठेवल्या होत्या. दरम्यान, ते व त्यांचा मुलगा एकनाथ श्रीरामपूर येथे नातेवाईकांच्या जागरण गोंधळ कार्यक्रमाला गेले होते.
पुढील दिवशी सकाळी घरी आल्यानंतर कपाऊंडमधील 30 मोठ्या मेंढ्या गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाऊंड तपासले असता तारेचे कुंपण काढून अज्ञात चोरट्यांनी या मेंढ्या चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.
या चोरी गेलेल्या मेंढ्यांची किंमत अंदाजे रु. 3 लाख इतकी असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. घटनेची नोंद राहाता पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.