पानोडी । झुंजार न्यूज

 

 

 

ग्रामीण भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांवर पानोडी येथील ग्रामसभेत सखोल चर्चा झाली. सरपंच गणपत हजारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणे आणि तलाठी अनिकेत मंडलिक यांनी शासनाच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान’, प्रधानमंत्री आवास योजना, ‘सेवा पंधरवाडा’ आणि ग्रामीण रस्त्यांचे सीमांकन व क्रमांक निश्चित करण्याबाबत माहिती दिली.

 

 

 

रस्ते की ओढे? ग्रामस्थांचा सूर ओढ्यांच्या दिशेने

 

 

विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पाय मार्ग आणि शेतावर जाण्याचे मार्ग यांच्या सीमांकनावरून आणि त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यावरून ग्रामस्थांमध्ये मोठी चर्चा झाली. यावेळी रस्ते व ओढे यामुळे निर्माण झालेल्या शंका आणि समस्यांवर विचारमंथन झाले. अनेक ग्रामस्थांनी खासगी क्षेत्रातून रस्ते न काढता, ओढ्यांचाच रस्ते म्हणून वापर करण्याची मागणी केली. ‘सर्व गावातील ओढे मोकळे करा आणि त्या ओढ्यानेच वहिवाट ठेवा,’ असा सूर ग्रामस्थांमधून उमटला. रस्त्यांमुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते.

 

 

आदिवासी ठाकर समाजाच्या निवाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर

 

 

या ग्रामसभेत आदिवासी ठाकर समाजाच्या लोकांची नावे घरकुलातून वगळल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या जागेवर वन विभागाने दावा ठोकल्याने या आदिवासी लोकांच्या निवाऱ्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकर समाज्यासह इतर ग्रामस्थांनी त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी केली.

 

 

सशक्त नारी, समृद्ध नारी’ महिला आरोग्य तपासणी अभियान

 

यावेळी आरोग्य विभागाने ‘सशक्त नारी, समृद्ध नारी’ योजनेंतर्गत तीन दिवसीय महिला आरोग्य तपासणी अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली. सर्व महिलांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

 

 

 

 

या ग्रामसभेत उपसंरपच विक्रम थोरात , रावसाहेब घुगे, बाळासाहेब कदम, बबनराव कराड, रामनाथ पवार, पांडुरंग सांगळे, गोपाळ थोरात, भारत शेवाळे, सूर्यभान थोरात, विठ्ठल घोडेकर, कारभारी हजारे सर, गणेश कदम, संतोष चव्हाण, रविंद्र खंडाळे, दिपक जाधव, दत्तात्रय चव्हाण, रामदास बर्डे, पशुवैद्यकीय अधिकारी शिवाजी फड आदींसह आरोग्य विभाग, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *