दिल्ली । झुंजार न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म १७सप्टेंबर १९५० रोजी उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या गावी झाला. दामोदरदास व हिराबा या दाम्पत्याला झालेल्या एकूण सहा अपत्यांपैकी नरेंद्र हे त्यांचे तिसरे अपत्य. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिलेच पंतप्रधान होय .
मोदी कुटुंबाची परिस्थिती त्या काळी अतिशय सामान्य, गरिबीची म्हणता येईल अशी होती. उपजीविकेसाठी त्यांचे वडील वडनगर रेल्वे स्थानकावर चहा विकत असत. नरेंद्र मोदी यांना लहानपणी लष्करात जाण्याची इच्छा होती. जामनगर येथील सैनिकी स्कूलमध्ये शिकण्याचीही त्यांची मनीषा होती. मात्र, पैशांअभावी ते शक्य झाले नाही. मोदी वयाच्या आठव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. पुढे त्यांना लक्ष्मणराव इनामदार भेटले. त्यांनी मोदींना बालस्वयंसेवक म्हणून संघाच्या कार्यात सामील करून घेतले.

नोटाबंदी ते ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे धाडसी निर्णय
सन १९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर मोदी संघाचे पूर्ण वेळ प्रचारक झाले. नंतर १९८५ मध्ये ते भारतीय जनता पक्षात दाखल झाले. तरुण वयात मोदींनी एकट्याने बरीच भ्रमंती केली. जवळपास सर्व भारत त्यांनी हिंडून पाहिला. ते हिमालयातही गेले. तेथे तपश्चर्या करणाऱ्या अनेक साधूंना ते भेटले. पुढे आणीबाणीच्या काळात अटक टाळण्यासाठी व पोलिसांना फसवण्यासाठी त्यांनी शीख असल्याचे भासवले होते व तशी वेषभूषा केली होती. आणीबाणीतील घटनांवर त्यांनी गुजराती भाषेत पुस्तकही लिहिले आहे.

मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. ते स्वामी विवेकानंदांच्या मतांना कायम भेटी देत असतात. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ राहिलेले नेते अशी नोंद मोदी यांच्या नावावर आहे.
मोदी अतिशय कार्यतत्पर आहेत. ते अतिशय कमी झोपतात. लवकर उठून प्राणायाम, योग करतात. परदेशी दौऱ्यावर असतील तर विमानातच झोप काढता येईल, अशा रीतीने दौरा आखतात. अगदीच नाइलाज असेल तर एखाद्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस आहे.
वाढदिवसानिमित्त देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
आज देशभरात मोदींचा वाढदिवस साजरा केला जातो आहे.
केंद्रात भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेवर येण्यापूर्वी ते दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी अनेक वाद असले तरी त्यांनी दिल्ली विद्यापीठातून मुक्त शिक्षण पद्धतीने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्याचे सांगितले जाते.
त्यानंतर गुजरात विद्यापीठातून मोदींनी राज्यशास्त्र हा विषय करून मास्टर्स पदवीही मिळवली.
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या आई हिराबेन यांनी दिलेल्या शिकवणींची अनेकदा आठवण करून दिली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश व जगभरातून मिळालेल्या १३०० भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव होणार आहे.
येत्या २ ऑक्टोबरपर्यंत हा लिलाव चालू असेल.
मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम गंगा नदीच्या स्वच्छतेच्या कामासाठी वापरली जाईल. सर्व पैसे नमामि गंगे या मोहीमेसाठी दिले जातील.
देश व जगभरातील कुठलीही व्यक्ती या ऑनलाईन लिलावात सहभागी होऊ शकते













