महाराष्ट्राच्या छातीवर उभे असलेले सर्वोच्च कळसुबाई शिखर नवरात्रीच्या पावन पर्वावर भक्ती, श्रद्धा आणि शौर्याने उजळून निघाले आहे. घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे गिर्यारोहक इ.स. १९९७ पासून अखंडपणे हा अनोखा धार्मिक उपक्रम जोपासत आहेत. तब्बल २९ वर्षांपासून नवरात्रीत घटस्थापना करून विजयादशमीपर्यंत उपवास आणि दररोज शिखर सर करून शिखरस्वामिनी कळसुबाई मातेसमोर पूजा-अर्चा करण्याची परंपरा मंडळाने आजवर खंडन होऊ दिलेली नाही.
या भक्तीमय पर्वाची दखल घेऊन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवरात्रीच्या पूर्वसंध्येला घटकलशाचे पूजन करून मंडळाला सुपूर्द केला. गिर्यारोहकांच्या श्रद्धा व साहसाचे कौतुक करीत त्यांनी नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी गिर्यारोहकांनी शिखरावर आवश्यक सुविधा व आधुनिक सोयी उपलब्ध करून द्याव्यात तसेच मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष कळसुबाई मातेच्या दर्शनाला यावे अशी विनंती केली.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच पहाटे मंडळाचे गिर्यारोहक शिखर सर करून शिखरस्वामिनी कळसुबाई मातेचे पूजन, आरती व घटस्थापना करून भक्तीचा दीप प्रज्वलित केला. एकदा शिखर सर करून परतल्यावर साधारण गिर्यारोहक दोन दिवस विश्रांती घेतात, पण हे गिर्यारोहक गेल्या तीन दशकांपासून न थकता, न थांबता रोज सर्वोच्च शिखर सर करीत आहेत. हीच त्यांची भक्ती, श्रद्धा व पराक्रमाची खरी ओळख आहे.
या स्तुत्य उपक्रमात संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत, डॉ. महेंद्र आडोळे, डॉ. कैलास गायकर, निलेश आंबेकर, निलेश पवार, प्रवीण भटाटे, बाळू आरोटे, अशोक हेमके, बाळू भोईर, राजेंद्र माने, भगवान तोकडे, नाना टाकळकर, विकास जाधव, गजानन चव्हाण, ज्ञानेश्वर मांडे, चेतन जाधव तसेच इतर गिर्यारोहक उपस्थित होते.
कळसुबाई शिखरावरील हा भक्ती, शौर्य व श्रद्धेचा संगम केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर सर्व गिर्यारोहक व भक्तांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.