राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त जयहिंदच्या वतीने प्रभात फेरी व भजन गायन

संगमनेर । झुंजार न्यूज 

भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवार दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वा. महात्मा गांधीजी यांची वेशभूषा केलेले 200 विद्यार्थ्यांची प्रभात फेरी करणार असून विविध शाळांमधील 600 विद्यार्थी बसस्थानकावर होणाऱ्या सामूहिक भजन कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती सौ.दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने अधिक माहिती देताना सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका असणारे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहाने देशात साजरी होते. सत्य आणि आयुष्याचा मंत्र देणाऱ्या गांधीजींनी जगाला शांततेचा संदेश दिला आहे.

त्यांच्या जयंती निमित्ताने गुरुवारी सकाळी 8 वा. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, आणि संगमनेर बस स्थानक अशी प्रभात फेरी होणार आहे. या प्रभात फेरीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेले 200 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावरील विविध चित्ररथ या प्रभात फेरीमध्ये सहभागी होणार आहे. तर संगमनेर बस स्थानकावर सामूहिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. या भजन कार्यक्रमांमध्ये विविध शाळांमधील 600 विद्यार्थी महात्मा गांधी यांच्या प्रार्थना गीतांचे सामूहिक गायन करून अभिवादन करणार आहेत.

या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा.मंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या प्रभात फेरी व भजन कार्यक्रमासाठी संगमनेर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *