संगमनेर । झुंझार न्यूज
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र सध्या परतीच्या पावसाने राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला असून अशा संकट काळामध्ये त्याला शक्ती दे व सर्व नागरिकांच्या जीवनात आनंद समाधान निर्माण होऊ दे अशी प्रार्थना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजीमहसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
संगमनेर मधील देवी गल्ली येथे सप्तशृंगी देवीचे दर्शन घेऊन त्यांनी महाआरती केली. यावेळी समवेत मा.आ.डॉ.सुधीर तांबे, मा.नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह संगमनेर शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, नवरात्र उत्सव हा भारतातील समृद्ध परंपरेचे प्रतीक आहे. हे आनंदाचे पर्व आहे. महिला शक्तीचा जागर यानिमित्ताने आपण करत असतो. महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहे. सर्व लोक मोठ्या श्रद्धेने जगदंबा मातेचे दर्शन घेत असतात. यावर्षी राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला मात्र उत्तरार्धात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. बळीराजा हवालदील झाला आहे. अनेकांचे पशुधन मृत पावली आहे तर शेती खचली आहे. उभे पिके वाहून गेली आहे. अशा संकट काळामध्ये या शेतकऱ्याला सावरण्याची शक्ती दे अशी प्रार्थना करताना राज्य व केंद्र सरकारने शेतकरी बांधवाला तातडीने सरसकट कर्जमाफी करून मदत करण्याची सद्बुद्धी माता जगदंबेने द्यावी अशी प्रार्थना त्यांनी केली.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, श्री शक्तीचा जागर नवरात्राच्या निमित्ताने संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात होत आहे. पर्यावरण पूरक आणि आनंदाने हा उत्सव सर्वांनी साजरा करावा. राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या काळात माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला असून सरकार मात्र सुस्त असल्याची टीका त्यांनी केली. तर सौ.दुर्गाताई तांबे यांनी अतिवृष्टीच्या काळात नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी असे आवाहन केले.
यावेळी सर्वांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनी संगमनेर शहरातील विविध नवरात्र उत्सव मंडळांना भेटी दिल्या.
Post Views: 565




