आश्वी । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील उंबरी बाळापूर गावचे सुपुत्र अशोकभाऊ अंतोन शेळके यांची काँग्रेस पक्षाने त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची दखल घेऊन काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे संगमनेर तालुक्यात काँग्रेस पक्षाला आणखी बळकटी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
माजी महसूल मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते अशोकभाऊ शेळके यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस मागासवर्गीय विभागाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
अशोकभाऊ शेळके हे अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी समाजात विविध स्तरांवर काम केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत काँग्रेस पक्षाने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
अशोकभाऊ शेळके हे काँग्रेस पक्षाचे विचार आणि कार्य समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतील, अशी अपेक्षा पक्षाने व्यक्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती विभागाचे कार्य अधिक वेगाने होईल आणि पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


