संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व. शिवाजीराव प्रतापपारव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्थेने आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळीची भेट दिली आहे. संस्थेकडून तब्बल ६२ लाख रुपयांचे रिबेट थेट दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन गणेश जाधव यांनी दिली. या अनपेक्षित दिवाळी भेटीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वर्गीय थोरात दूध संस्थेशी संलग्न असलेल्या दूध उत्पादकांना राजहंस दूध संघाकडून प्रति लिटर १ रुपया ३० पैसे, दूध संस्थेकडून १ रुपया २० पैसे, अनामत २ रुपये आणि चढउतार २० पैसे असे मिळून एकूण ४ रुपये ७० पैसे प्रति लिटरप्रमाणे रिबेट वाटप करण्यात आले आहे. हे एकूण ६२ लाख रुपये दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्यामुळे त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे.
या वाटपाबद्दल बोलताना राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात म्हणाले की, “आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी वर्षभर केलेल्या कष्टाचे हे फळ आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर त्यांना आर्थिक मदत मिळाल्याने त्यांची दिवाळी अधिक आनंदात जाईल याचा आम्हाला आनंद आहे.
एकिकडे रिबेट मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असली तरी, दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पिकांसह अनेक दूध उत्पादकांचा चारा पूर्णपणे नष्ट झाला आहे. यामुळे जनावरांसाठी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, ही चिंतेची बाब आहे. भविष्यात जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करू शकते, त्यामुळे यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
या रिबेट वाटप प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन देवराम हजारे, संचालक विनायकराव थोरात, विठ्ठल घोडेकर, बाळासाहेब तळेकर, दत्तात्रय चव्हाण, भाऊसाहेब सुळ, गोरख मुंढे, बाळासाहेब नागरे, संदीप थोरात, भास्कर कदम, सौ. रोहिणी पाबळ, सौ. अलका सानप तसेच संस्थेचे सचिव एकनाथ खेडकर, सहाय्यक मारुती पाबळ आणि सहाय्यक अनिकेत वाकचौरे आदी उपस्थित होते. संस्थेच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.