अहमदनगर जिल्हा परिषदेच्या (आता अहिल्यानगर) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी भाजपने आपला उमेदवार निश्चित केला आहे. अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुनीता भांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजप योग्य उमेदवाराच्या शोधात होती. याचदरम्यान, सुनीता भांगरे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण , पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , माजी आमदार वैभव पिचड यांच्या उपस्थितीत सुनीता भांगरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे आता त्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
पवारांची साथ सोडून भांगरे भाजपवासी
अकोले तालुक्यातील एक महत्त्वाचे राजकीय घराणे म्हणून भांगरे कुटुंबाची ओळख आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांच्या अकाली निधनानंतर, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्वतः अकोल्यात येऊन अमित भांगरे आणि सुनीता भांगरे यांना राजकीय पाठबळ देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले, परंतु त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते.
आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुनीता भांगरे यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपचे ‘कमळ’ हाती घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार पक्ष) मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. भांगरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या निर्णयाचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया
सुनीता भांगरे यांच्या भाजप प्रवेशामुळे अकोले आणि पर्यायाने अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची ताकद वाढणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः आदिवासी बहुल भागात भाजपला यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या या निष्ठावंत नेत्याच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.