संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

गाईंची दूध उत्पादकता वाढवण्यासाठी आणि सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघात ‘प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या कार्यक्रमात बोलताना सहकारी संस्थांचे महत्त्व अधोरेखित केले. खासगी संस्था केवळ नफा मिळवण्यासाठी काम करतात, तर सहकार हे सर्वसामान्यांच्या समृद्धीचे व्रत आहे, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाच्या वतीने आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख होते.

यावेळी बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेल्या दूध व्यवसायामुळे तालुक्यात कशी आर्थिक समृद्धी आली, याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, सहकारी संस्था खासगी संघांवर अंकुश ठेवतात, कारण खासगी संस्थांचा मुख्य उद्देश नफेखोरी असतो आणि त्यांच्या उत्पादनांमध्ये अनेकदा गुणवत्ता किंवा चांगला भाव नसतो. याउलट, सहकारी दूध संघ सहकाराचे व्रत जपतो. या कार्यशाळेचा उद्देश सहकाराच्या विचारांचे मंथन करणे हाच होता. देशी गाईंना असलेल्या मर्यादांनंतर आलेल्या संकरित गाईंमुळे दूध व्यवसायात वाढ झाली आणि त्यातून ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली. दूध व्यवसाय हा कष्टाचा असून, प्राथमिक संस्थांनी यात शिस्त पाळणे आवश्यक आहे. गोठा आणि दूध काढण्याच्या मशीनची स्वच्छता तसेच कमी गाईंच्या संख्येत अधिक दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी प्राथमिक संस्थांनी शेतकऱ्यांना दोन वेळेस दूध संकलनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही केले

दूध संघाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या मुरघास आणि मुक्त संचार गोठा या संकल्पना अत्यंत प्रभावी असल्याचे थोरात यांनी सांगितले. शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचा मुरघास बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, कारण 1982 मध्ये प्रथम मुरघास तयार केला गेला होता, ज्यामुळे गाईंना पौष्टिक आहार मिळतो. ‘राजहंस’ दूध संघाचे स्वच्छ आणि गुणवत्तेचे दूध हे वैशिष्ट्य असून, त्यांचे उपपदार्थही अत्यंत गुणवत्तापूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. दूध संघाने काटकसर व पारदर्शक कामकाज करून शेतकऱ्यांना रिबेट आणि चांगला भाव दिला आहे, त्यामुळे खोटा प्रचार करणाऱ्या प्रवृत्तींना वेळीच रोखण्याचे आवाहन त्यांनी केले.

चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी दूध व्यवसाय कष्टाचा असला तरी तो समाधान देणारा असल्याचे सांगितले. गावपातळीवरील पदाधिकारी आणि सचिवांचे चांगले काम हे तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी सांगितले की, सहकारी दूध संघांना खाजगीकरणाचे मोठे आव्हान आहे. खाजगी संघांना कोणतीही बंधने नसतात, तर सहकाराला अनेक बंधने पाळावी लागतात. खासगी दूध संघ आणि संकलन सेंटरवाले शेतकऱ्यांना ऍडव्हान्स देऊन सावकारी पद्धतीने गुंतवून टाकतात आणि वेळप्रसंगी अनामत रकमा कापतात. याउलट, सहकारात कायम शेतकऱ्यांचे हित जपले जाते. हा सहकार आपल्याला टिकवायचा आहे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी इम्पोर्टेड सिमेन, मुरघास, मुक्त संचार गोठा आणि गाईंच्या आरोग्याची काळजी असे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. प्राथमिक सहकारी संस्थांनी स्वच्छतेवर अधिक भर देऊन चार डिग्रीपर्यंतचे दूध सातत्याने कसे पुरवता येईल यावर लक्ष द्यावे, तसेच दूध संकलन वाढवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन देशमुख यांनी केले. प्राथमिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विद्युत सोलरसह विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी गाईची कास, दूध काढण्याचे मशीन आणि गोठा कायम स्वच्छ ठेवावा. प्राथमिक संस्थांनी त्यांची स्वच्छता राखून दोन वेळेस दूध संकलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ‘राजहंस’ दूध संघाचे सर्व पदार्थ अत्यंत गुणवत्तेचे असून, शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी या उपपदार्थांचा जास्तीत जास्त वापर करावा, असेही ते म्हणाले.

कार्यशाळेत सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक अॅड. अनिल भांगरे यांनी सहकारी संस्थांचे कायदे व नियम यावर मार्गदर्शन केले, तर कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी यांनी दुभत्या गाईंचा आहार, संगोपन व स्वच्छ दूध निर्मिती यावर सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास माधवराव कानवडे, पांडुरंग पाटील घुले, व्हाईस चेअरमन राजेंद्र पाटील चकोर, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, आर. बी. राहणे, संचालक विलासराव वर्षे, भास्करराव सिनारे, संतोष मांडेकर, विलास कवडे, बबन कुऱ्हाडे, बादशहा वाळुंज, संजय पोकळे, विक्रमराजे थोरात, विष्णू ढोले, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, भारत मुंगसे, गोरख नवले, डॉ. प्रमोद पावसे, के.के. थोरात, सेवानिवृत्त सहाय्यक निबंधक अॅड. अनिल भांगरे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुजित खिलारी यांनी केले. 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *