संगमनेर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि तांबे कुटुंबाचा पारंपरिक प्रभाव, तर दुसरीकडे आमदार अमोल खताळ आणि त्यांना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा असलेला खंबीर पाठिंबा, यामुळे संगमनेरमध्ये दोन पिढ्यांमधील थेट राजकीय लढत पाहायला मिळणार आहे.
आमदार खताळ हे सामान्य कुटुंबातून आलेले आणि तरुणाईचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी खताळ यांनी घेतलेली मेहनत, मंत्री विखे यांचा थेट पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील वाढती नाराजी यामुळे थोरात गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
मात्र, थोरात-तांबे गटानेही शहरात आपली पकड पुन्हा मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी, शहर विकास आघाडीकडून तांबे कुटुंबातील एका महिलेला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तांबे कुटुंबाला पालिकेतील दीर्घ अनुभव, थोरात यांचे मजबूत जाळे आणि कार्यकर्त्यांचा भक्कम आधार यामुळे त्यांचे पारडे सध्या जड दिसत आहे. जातीय आणि सामाजिक समीकरणांचा विचार करता नगराध्यक्षपदाचा कल काँग्रेसकडेच जाण्याची शक्यता आहे.
शहराच्या विकासाचे प्रश्न आणि नागरिकांची नाराजी संगमनेर नगरपालिका दशकांपासून काँग्रेसच्या ताब्यात असली तरी, शहराच्या विकासाबाबत अनेक गंभीर प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय अवस्थेत असून, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वाढते अतिक्रमण, अवैध धंदे आणि कत्तलखाने यावर पालिकेचा निष्क्रियपणा नागरिकांच्या नाराजीचे मुख्य कारण बनला आहे. वाहतूक कोंडी, सिग्नल यंत्रणेचा अभाव आणि अव्यवस्थित बाजारपेठ यांसारख्या समस्याही दिवसेंदिवस तीव्र होत आहेत.
एकिकडे तांबे-थोरात गटाची परंपरा आणि संघटनशक्ती, तर दुसरीकडे खताळ-विखे यांची नव्या पिढीतील लोकप्रियता आणि कार्यशैली अशी ही संगमनेरमधील लढत रंगणार आहे. आता मतदार राजा कुणाला कौल देतो, पारंपरिक गड राखला जातो की नवा इतिहास घडतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यंदाची संगमनेर नगरपालिकेची निवडणूक केवळ राजकीय नसून, ती प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे हे निश्चित.