दुष्काळग्रस्त पठार भागाला मिळणार मुळा धरणाचे पाणी ! 

 

साकूर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील झिरपी तलाव, बिरेवाडी येथील पाझर तलाव आणि जांबूत येथील केटीवेअरची राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार अमोल खताळ आणि जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकार्यांसमवेत पाहणी केली. या पाहणी दौऱ्यामुळे साकूर पठार भागातील अनेक वर्षांपासूनच्या पाणी प्रश्नावर तोडगा निघण्याची आशा पल्लवित झाली आहे.

 

जलसंपदा विभागाने या भागासाठी महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सध्या वेगाने सुरू आहे. या योजनेमुळे लवकरच मुळा धरणातून साकूर व पठार भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

गेली अनेक वर्षे साकूर व पठार भागातील गावांना भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले होते आणि जीवनमानही विस्कळीत झाले होते. ही परिस्थिती बदलण्यासाठी जलसंपदा विभागाने ठोस पावले उचलली असून, ना. विखे पाटील यांच्या पुढाकाराने या निर्णयामुळे पठार भागातील शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा आणि विकासाचा काळ सुरू होणार आहे.

 

या उपसा सिंचन योजनेमुळे केवळ शेतीलाच नव्हे, तर पिण्याच्या पाण्याची समस्याही मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, लवकरच ही योजना पूर्णत्वास येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *