आश्वी । झुंझार न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहराची पाणी योजना सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः कोपरगाव शहरात लागलेल्या फलकांमुळे संगमनेरच्या पाणीपुरवठ्याची पुन्हा एकदा उजळणी झाली आहे. “संगमनेरमध्ये दररोज पाणी येते, जे संगमनेरला जमले ते कोपरगावला का नाही?” असा प्रश्न विचारणारे फलक कोपरगावात झळकल्याने संगमनेरच्या पाणी योजनेचे कौतुक सर्वत्र होत आहे.

 

 

अद्वितीय पाणी व्यवस्था

महाराष्ट्रातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना, संगमनेर हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शहर आहे जिथे दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने पाणी उपलब्ध होते. इतर शहरांमध्ये रात्री-अप्रात्री पाणी येते, किंवा माती मिश्रित, अस्वच्छ पाणी पुरवले जाते, अशा स्थितीत संगमनेरची पाणी योजना एक आदर्श मॉडेल म्हणून पुढे आली आहे. इतकेच नाही तर, अनेक शहरांना पावसाळ्यातही पाणीटंचाई जाणवते, पण संगमनेरमध्ये उन्हाळ्यातही दररोज दोन वेळा पूर्ण दाबाने शुद्ध पाणी मिळते.

 

बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीचे फळ

संगमनेरच्या या यशस्वी पाणी योजनेमागे तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री आणि सध्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची दूरदृष्टी होती. सन १९९९ मध्ये निळवंडे धरणाच्या कामाला गती मिळाली, त्याचवेळी संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाइन आणण्याची कल्पना थोरात यांनी मांडली. शिवकालीन पाणी योजनांच्या धर्तीवर गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने निळवंडे धरणातून पाईपलाइनद्वारे पाणी शहरात आणले गेले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे थोरात यांनी या पाईपलाइनला प्रशासकीय मंजुरी मिळवून काम सुरू केले. या योजनेमुळे संगमनेर शहराचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटला.

 

 

योजनेची रचना आणि कार्यप्रणाली

पाणी स्रोत  निळवंडे धरणाच्या भिंतीच्या तळाशी संगमनेरसाठी एक स्वतंत्र व्हॉल्व्ह बसवण्यात आला आहे.

पाईपलाइन निळवंडे ते अकोले अशी ३८ किलोमीटर लांबीची ही पाईपलाइन आहे.

गुरुत्वाकर्षण प्रणाली  उताराच्या साहाय्याने पाणी थेट संगमनेरमध्ये पोहोचते, ज्यामुळे वीज खर्चात मोठी बचत होते.

पाणी वितरण धरणातून पाणी आल्यानंतर, शहरातील जुन्या पाईपलाइन काढून त्याऐवजी बिडाच्या नवीन पाईपलाइन बसवण्यात आल्या आहेत. आज सात मोठ्या टाक्यांद्वारे दररोज सुमारे एक कोटी लिटर पाणी नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचते. महत्त्वाचे म्हणजे, दुसऱ्या मजल्यापर्यंतही मोटारशिवाय पाणी जाते.

शुद्ध पाण्याची हमी

संगमनेरमध्ये केवळ मुबलकच नाही तर शुद्ध पाणीही उपलब्ध आहे. यासाठी अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यरत आहे. २०२१ मध्ये तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २३ कोटी रुपयांच्या अद्ययावत जलशुद्धीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळवली होती, ज्यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी मिळते.

 

कोपरगावात लागलेल्या फलकांमुळे संगमनेरच्या या आदर्श पाणी योजनेची चर्चा आता राज्यभरात होत आहे आणि इतर शहरांनाही या योजनेतून प्रेरणा मिळत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *