श्रीरामपूर । झुंझार न्यूज

भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेले प्रकाश चित्ते यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी रद्द करून ज्या व्यक्तीचा शिवसेनेशी कधीही संबंध आला नाही, अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्याने आपल्यावर अन्याय झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ. सविताताई किशोर वाडिले यांनी केला आहे. या अन्यायाबाबत आपण उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे लवकरच लेखी स्वरूपात पुराव्यासह तक्रार करणार असल्याचे सौ. वाडिले यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

 

 

सौ. वाडिले यांनी आपल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, शिंदे शिवसेनेच्या स्थापनेपासून मी आणि माझ्या पतीने पक्षाच्या वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. शिंदे शिवसेना अडचणीत असताना पक्षासमोर येणाऱ्या प्रत्येक समस्यांना आम्ही तोंड देत त्या सोडवल्या आहेत. आगामी नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारीबाबत झालेल्या मुलाखतीदरम्यान माझ्या प्रभाग क्रमांक चारमधून फक्त माझीच मुलाखत झाली होती. त्यावेळी त्या प्रभागातून इतर कोणीही मुलाखत देण्यासाठी पुढे आले नव्हते. त्यानंतर वरिष्ठांनी माझ्या उमेदवारीला अनुकूलता दर्शवली होती आणि तयारी करण्यासही सांगितले होते. त्यानुसार मी सर्व प्रकारचे ना हरकत दाखले मिळवले होते.

 

 

माझी हक्काची उमेदवारी मला न देता दुसऱ्या त्रयस्थ व्यक्तीला प्रकाश चित्ते यांनी दिल्याने माझ्या प्रभागातील मतदारांमध्ये आणि शहरातील माझ्या भोई समाज बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. माझ्याप्रमाणेच प्रभाग क्रमांक सात, बारा आणि पंधरा या प्रभागातही असाच उमेदवारी वाटपाचा घोळ प्रकाश चित्ते यांनी केल्याचे सौ. वाडिले यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 

 

संभाव्य परिणाम

 

या प्रकरणामुळे शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उघडकीस येण्याची शक्यता आहे.

उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे स्थानिक पातळीवर पक्षाला फटका बसू शकतो.

सौ. वाडिले यांच्या तक्रारीनंतर पक्षश्रेष्ठी यावर काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *