प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना बालपण स्कूल, पानोडीच्या विद्यार्थ्यांनी सदिच्छा भेट देत एक अनोखी आणि भावनिक साद घातली. “महाराज, तुम्ही कीर्तन थांबवू नका!” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आणि विद्यार्थ्यांनी महाराजांप्रति असलेले आपले प्रेम आणि आदर व्यक्त केला.
इंदोरीकर महाराजांच्या सडेतोड भाषाशैलीला आणि प्रभावी मांडणीला विद्यार्थ्यांकडून विशेष पसंती मिळत असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले. महाराज आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाज प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. विशेषतः युवा पिढीमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात आणि त्यांच्या कीर्तनातून युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळते, हे विद्यार्थ्यांनी ओळखले.
या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी महाराजांशी संवाद साधत त्यांना आवाहन केले की, “तुमच्या कीर्तनातून आम्हाला संस्कार, विनोद, शहाणपण आणि जीवनमूल्ये मिळतात. तुमची ही सेवा थांबता कामा नये.” विद्यार्थ्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांच्या व्याख्यान आणि कथनशैलीमुळे समाजात सकारात्मक बदल घडत आहेत आणि त्यामुळे कीर्तन परंपरा निरंतर चालू ठेवण्याचे आव्हान त्यांनी महाराजांना दिले.
या भावनिक विनंतीने इंदोरीकर महाराजही भारावून गेले. त्यांनी आपली कीर्तन सेवा अशीच अविरतपणे चालू ठेवावी, अशी विनवणी विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे केली आणि त्यांना पुढील काळासाठी प्रोत्साहित केले.
बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांची ही सदिच्छा भेट त्यांची समाजभानाची जाण आणि संस्कारशीलता अधोरेखित करते. बालपण स्कूलच्या प्रमुख सौ. सोनाली मुंढे यांच्या संकल्पनेतून हा महाराजांना आव्हान देण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि आध्यात्मिक मूल्यांची रुजवात होताना दिसत आहे.