सध्या शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राजकीय वातावरण तापलेले असतानाच महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नगराध्यक्षपद हे शहराचे प्रथम नागरिक म्हणून अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. मात्र, या पदासाठी उभ्या असलेल्या जयश्रीताईंनी काल शिर्डीच्या आठवडे बाजारात आपल्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या उक्तीचा प्रत्यय त्यांनी कृतीतून दाखवून दिला आहे. नेमके काय घडले?
निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत काल (बुधवारी) जयश्रीताई आपल्या काही मैत्रिणींसमवेत शिर्डीच्या आठवडे बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. एरवी राजकीय नेत्यांभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असतो, परंतु जयश्रीताई अगदी सामान्य गृहिणीप्रमाणे बाजारात वावरताना दिसल्या. यावेळी उपस्थित पत्रकारांची नजर त्यांच्यावर पडली असता, त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
“माझ्यात कोणताही बदल नाही”
पत्रकारांनी त्यांना विचारले असता, त्या अत्यंत मनमोकळेपणाने म्हणाल्या, “मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असले, तरी मुळात मी एक गृहिणी आहे. मी नेहमीच माझ्या मैत्रिणींसोबत आठवडे बाजारात येते. निवडणुकीला उभे राहिले म्हणून माझ्या वागण्यात किंवा स्वभावात कोणताही बदल झालेला नाही, मी जशी आहे तशीच आहे आणि पुढेही तशीच राहीन.”
विखे पाटील कुटुंबाचे मानले आभार
यावेळी बोलताना जयश्रीताईंनी आपल्या उमेदवारीचे श्रेय विखे पाटील कुटुंबाला दिले. त्या म्हणाल्या, “नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे आणि धनश्रीताई विखे यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यांच्या भक्कम पाठबळामुळेच माझे नाव नगराध्यक्ष पदासाठी निश्चित झाले आहे. त्यांनी टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन आणि शिर्डी शहराची मान उंचावण्याचे काम करेन.”
शेतकरी आणि महागाईवर भाष्य
बाजारातील फेरफटक्यादरम्यान त्यांनी सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचे भाव वधारले असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
घरकाम सांभाळून करणार गावचा कारभार शेवटी आपला साधेपणा अधोरेखित करताना त्या म्हणाल्या की, “भविष्यात जरी मी नगराध्यक्ष झाले, तरी माझे घरकाम सांभाळूनच मी गावचा कारभार पाहणार आहे. पदाचा बडेजाव न करता जमिनीवर राहूनच काम करण्याला माझे प्राधान्य असेल.”
जयश्रीताई थोरात यांच्या या साध्या आणि जमिनीशी नाळ जोडलेल्या स्वभावामुळे शिर्डीत त्यांच्या नावाची आणि व्यक्तिमत्वाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.