स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

आश्वी । झुंझार न्यूज

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून रेशनिंगच्या सरकारी गहू आणि तांदळाचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत १२ हजार ८५० किलो धान्यासह दोन वाहने, असा एकूण १२ लाख २ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना १९ जून २०२६ रोजी रात्री गोपनीय माहिती मिळाली होती की, सोनगाव सात्रळ येथील यासिर सादिक तांबोळी याने साई बालाजी फर्निचर शेजारील एका पत्र्याच्या गोदामात रेशनिंगचा गहू व तांदूळ काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी साठवून ठेवला आहे. .


या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुनील पवार, रिचर्ड गायकवाड आणि रमीजराजा अतार यांचे एक विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या वेळी संबंधित गोदामावर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी यासिर सादिक तांबोळी (वय २६, रा. सोनगाव सात्रळ, ता. राहुरी) हा संशयित आढळून आला. पोलिसांनी गोदामाची झडती घेतली असता, त्या ठिकाणी गव्हाने आणि तांदळाने भरलेल्या शेकडो गोण्या तसेच दोन वाहने आढळून आली.


या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला:
गहू: २,०९,७०० रुपये किमतीचा ६,९९० किलो गहू (१२१ गोण्या).
तांदूळ: २,९३,००० रुपये किमतीचा ५,८६० किलो तांदूळ (११७ गोण्या).
वाहने: ७,००,००० रुपये किमतीची दोन वाहने.
एकूण मुद्देमाल: १२,०२,७०० रुपये.


ताब्यात घेतलेल्या यासिर तांबोळी याने प्राथमिक चौकशीत कबुली दिली की, त्याने हा गहू आणि तांदूळ परिसरातील रेशनिंग दुकानांमधून काळ्याबाजारात विक्री करण्यासाठी स्वस्तात खरेदी केला होता. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७१३/२०२६ नुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.


सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे रेशनिंग माफियांचे धाबे दणाणले असून, सरकारी धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे संकेत पोलीसांनी दिले .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *