झरेकाठी । झुंझार न्यूज

ग्रामीण आदिवासी भागातील तरुणी मुंबई च्या चंदेरी दुनियेत नाव कमविण्यासाठी येते पण येथील व्यवस्थेची ती बळी ठरते. मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रात अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी युवा अभिनेत्री संचिता उगले हिचे अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी मुंबईतील वर्सोवा येथील राहत्या घरी तिने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. मनोरंजन विश्वात तसेच तिच्या चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


संचिता उगले अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील मूळ रहिवासी तिचे वडील मच्छिंद्र उगले शेतकरी तर आई जयश्री गृहिणी आहे. डोंगरगाव येथे संचिताचे बालपण गेले. तिने गावातील मराठी शाळेत चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर कुटुंब मुंबईत स्थायिक झाल्याने पुढील शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासत तिने मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर रुपेरी दुनियेत आपले स्थान निर्माण केले होते.


संचिता उगले हिने मराठी आणि हिंदी मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. कुमकुम भाग्य या झी टीव्ही वरील मालिका संचिता यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. या लोकप्रिय मालिकेत त्यांनी ‘दिया टंडन’ ही व्यक्तिरेखा साकारली होती, ज्यामुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. वागळे की दुनिया या सोनी टिव्ही च्या अत्यंत लोकप्रिय कौटुंबिक मालिकेत त्यांनी ‘रुचिता जेटली’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. दिलवाली दुल्हा ले जाएगी दंगल टिव्ही च्या मालिकेत त्यांना मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळाली. यात त्यांनी साकारलेली ‘सुकून’ ही व्यक्तिरेखा खूप गाजली.


छावा या विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या भव्य ऐतिहासिक चित्रपटात संचिता यांनी तरुण महाराणी ताराराणी यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. सायलन्स २ या मनोज बाजपेयी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या थ्रिलर ओटीटी चित्रपटातही त्या एका भूमिकेत झळकल्या होत्या. क्राईम आज कल या क्राईम थ्रिलर शोचाही त्या एक भाग होत्या. टीव्ही आणि चित्रपटांशिवाय संचिता यांनी अनेक नामांकित ब्रँड्सच्या मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये काम केले होते. त्यात पार्ले-जी (Parle-G) कॅडबरी (Cadbury) व्हिस्पर यांचा समावेश होता.


चित्रपटसृष्टी म्हणजे स्वप्नांची दुनिया असे म्हटले जाते. चमकदार प्रकाश, मोठे पडदे, प्रसिद्धी आणि यश यामुळे अनेक तरुण-तरुणी या क्षेत्राकडे आकर्षित होतात. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी ही दुनिया एक मोठे स्वप्न घेऊन येते “आपलं नाव मोठं करायचं, स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायचं.”


ग्रामीण भागातील मुली साध्या कुटुंबातून, मर्यादित साधन संपत्तीमध्ये वाढलेल्या असतात. त्यांच्याकडे प्रचंड मेहनत करण्याची तयारी, प्रामाणिकपणा आणि संघर्षाची ताकद असते. शिक्षण, कला, नृत्य, अभिनय यामध्ये त्या चमक दाखवतात. त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत जाण्याची त्यांची इच्छा नैसर्गिक असते. चित्रपटसृष्टीत यश मिळाल्यास प्रसिद्धी, पैसा आणि सामाजिक ओळख मिळते. सोशल मीडिया आणि टीव्हीमुळे हे आकर्षण आणखी वाढले आहे. अनेकजण “एका रात्रीत स्टार” होण्याचे स्वप्न पाहतात. पण प्रत्यक्षात ही वाट सोपी नसते.
फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळवणे जितके कठीण आहे, तितकेच तिथे टिकून राहणेही अवघड आहे. काही प्रमुख आव्हाने अशी असतात: तीव्र स्पर्धा, सतत नकार मिळणे, आर्थिक अनिश्चितता, ओळखींचा आणि नेटवर्कचा प्रभाव, सलग चौदा पंधरा तास काम, अवेळी जेवण, अपुरी झोप यामुळे त्यांच्यावर ताण येतो. ग्रामीण भागातून आलेल्या मुलींसाठी हे सर्व अधिक आव्हानात्मक ठरू शकते, कारण त्यांना शहरातील वातावरण, भाषा, आणि जीवनशैलीशी जुळवून घ्यावे लागते.
यश न मिळाल्याने किंवा सतत अपयश आल्याने अनेक वेळा मानसिक तणाव वाढतो. काही वेळा अपेक्षा आणि वास्तव यामध्ये मोठी दरी निर्माण होते. .


प्रत्येक क्षेत्रात मेहनत आणि वेळ लागतो. तसेच कोणत्याही व्यक्तीच्या मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने बोलणे, मदत घेणे याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील मुली असोत किंवा शहरी—त्यांचे स्वप्न, संघर्ष आणि भावना समान असतात. फिल्म इंडस्ट्री हे संधींचे क्षेत्र आहे, पण तितकेच कठोरही आहे. त्यामुळे यशाबरोबरच मानसिक स्थैर्य, योग्य मार्गदर्शन आणि वास्तवाची जाणीव असणे हेच खरे यशाचे सूत्र आहे.


संचिता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, मुंबईसारख्या शहरात टिकून राहणे आणि ‘आऊटसायडर’ म्हणून बॉलिवूड चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळवणे खूप कठीण असते. त्यामुळे त्या टीव्ही मालिकांमधील चांगल्या भूमिकांना प्राधान्य देत होत्या. त्यांनी आपल्या बेधडक स्वभावाने ग्लॅमर इंडस्ट्रीतील कटू सत्यही मांडले होते. एका मुख्य भूमिकेसाठी निवड झाली असतानाही अगदी शेवटच्या क्षणी त्यांना मालिकेतून बदलण्यात करण्यात आले होते, ज्याचा त्यांना मानसिक धक्का बसला होता. काही काळापूर्वी संचिताने सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर येणाऱ्या मानसिक दबावावर चिंता व्यक्त केली होती आणि तरुण पिढी या ऑनलाइन व्हॅलिडेशनला बळी पडत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीने एक उत्तम आणि स्पष्टवक्ता तरुण कलाकार गमावला आहे


संचिता च्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने (AICWA) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे. ग्लॅमर इंडस्ट्रीतील कलाकारांवर वाढणारा मानसिक छळ थांबवण्यासाठी ही चौकशी गरजेची असल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *