झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर विभागातील विविध ठिकाणी धडक कारवाई करत हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. १२ ते २० जून २०२५ या कालावधीत श्रीरामपूर शहर, टाकळीभान, गोंधवणी, सुतगिरणी परिसर, भैरवनाथ नगर, बेलापूर, मालुंजा तसेच नेवासा तालुक्यातील विविध भागांत छापे टाकण्यात आले.

या कारवाईत हातभट्टी दारू निर्मितीसाठी साठवून ठेवलेले साहित्य, रसायने तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४ लाख ६६ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच कारवाईदरम्यान ०२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

मा. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क श्री. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर घोमकर, अधीक्षक प्रमोद सोनवणे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. श्रीरामपूर, राहाता व नेवासा तालुक्यांतील विविध ठिकाणी सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायावर विभागाने वचक निर्माण केला आहे.

कारवाईदरम्यान महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून, काही आरोपींविरुद्ध चांगल्या वर्तणुकीच्या बाँडचीही कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा पुढील तपास उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे.

उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यनिर्मिती व तस्करीविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे अवैध हातभट्टी दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *