आश्वी । झुंझार न्यूज

शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करू देण्यासाठी आणि अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एका खाजगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. नितीन किसन खर्डे (वय २९, रा. चंदनापुरी झोळे, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या खाजगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

यातील तक्रारदार हे जेसीबी मशीनच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे सपाटीकरण करण्याचे काम करतात. ८ जून २०२६ रोजी आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदारांना तलाठी कार्यालय येथे बोलावून घेतले होते. त्या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्यासोबत कामकाजाबाबत चर्चा झाली. त्यानंतर तक्रारदार कार्यालयाबाहेर जात असताना, नितीन खर्डे याने त्यांना अडवले. “शेतजमिनीच्या सपाटीकरणाचे काम करण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने ५,००० रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुमच्यावर अवैध गौण खनिज उत्खननाचा गुन्हा दाखल केला जाईल,” अशी धमकी देत लाचेची मागणी केली.

लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी १९ जून २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपी नितीन खर्डे याने तक्रारदाराकडे ५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

आज, २२ जून २०२६ रोजी नाशिक एसीबीच्या पथकाने संगमनेर परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ५०० रुपयांच्या १० नोटा म्हणजेच ५,००० रुपये स्वीकारताना आरोपी नितीन खर्डे याला पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस हवालदार संदीप वनवे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाळदे यांच्या पथकाने केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करत असेल, तर त्वरित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *