जागतिक स्तरावर साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पाथरे बु. येथे उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला.पालक, , विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेत सहभाग घेत निरोगी जीवनाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ शिक्षक जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, आधुनिक जीवनशैलीत योगाची वाढती गरज तसेच शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासामध्ये योगाचे असलेले अनन्यसाधारण योगदान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर सुदृढ राहते, मन शांत व प्रसन्न राहते तसेच एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो, असे त्यांनी सांगितले.
यानंतर विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेचा सराव करत योग दिन उत्साहात साजरा केला. विद्यार्थ्यांनी योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवत मोठ्या शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णासाहेब कडू , शिवाजी घोलप, सोमनाथ जेजुरकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक बारगुजे , पर्यवेक्षक तांबे, श्री अनारसे , पालक,,विद्यार्थी,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी नियमित योग करण्याचा संकल्प करत “योग अपनाएं, जीवन संवारें – स्वस्थ भारत का निर्माण करें” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. योगाच्या माध्यमातून निरोगी, सशक्त आणि सकारात्मक भारत घडविण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली.