संवत्सर येथे २२ वा स्मृतिदिन साजरा; ‘निसर्गकुंज जंगल सफारी’ केंद्राचे शानदार उद्घाटन !
झरेकाठी । झुंझार न्यूज
राहाता तालुक्यातील संवत्सर येथील ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक स्व. नामदेवराव परजणे यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्व. परजणे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, “स्व. नामदेवराव परजणे यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि लोकहितवादी क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या सहवासातील आठवणी आजही प्रेरणा देतात. त्यांचे विचार आणि कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”

साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाने रंगली स्मृतीसभा
स्मृतिदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ साहित्यिक व प्रसिद्ध कवी श्री. प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. दवणे यांनी आपल्या ओघवत्या शैलीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्गकुंज जंगल सफारी’ केंद्र
याच कार्यक्रमादरम्यान संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नूतन उभारण्यात आलेल्या ‘निसर्गकुंज जंगल सफारी’ केंद्राचे उद्घाटन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शालेय स्तरावर राबवण्यात आलेला हा पथदर्शी प्रकल्प विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती जागृती निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार प्रा. रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, सहकार महर्षी काका कोयटे, श्री. तानाजी पाटील-धसाळ, श्री. राजेश परजणे यांच्यासह परजणे परिवारातील सदस्य, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. .


