“गेल्या तीस वर्षांत आम्ही संगमनेर नगरपालिकेला शिस्त लावत शहराचा चेहरामोहरा बदलला. आदर्श नगरपालिका म्हणून काम करताना शहराला स्वच्छ पाणी आणि वैभवशाली प्रकल्प दिले. मात्र, सध्या काहीजण पूर्णवेळ ‘टोल वसुली’च्या मागे लागले आहेत. महायुतीचे मंत्री ‘डोंगर मंजूर’, ‘नद्या मंजूर’ अशा थापा मारत फिरत आहेत. त्यांनी अगोदर नगर-मनमाड रस्ता पूर्ण करावा आणि मगच संगमनेरमध्ये येऊन बोलावे,” अशा शब्दांत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले.
संगमनेर सेवा समितीच्या वतीने नाशिक-पुणे रोडवर, मार्केट कमिटीसमोर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, दिलीपराव पुंड, डॉ. जयश्रीताई थोरात, सोमेश्वर दिवटे, डॉ. मैथिलीताई तांबे यांच्यासह सेवा समितीचे उमेदवार व मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “संगमनेर सेवा समितीने यंदा ११ जुन्या आणि २० नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मागील ३० वर्षांत आम्ही निळवंडे धरण, कालवे, ३८ किमीची पाईपलाईन, आणि ३५ उद्याने उभारून शहराचा कायापालट केला. हे यश एका दिवसात मिळाले नाही, त्यामागे अपार कष्ट आहेत. मात्र, महायुतीचे मंत्री केवळ निवडणुकीपुरते ‘बनावबनवी’ करत आहेत. काल उपमुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावरून फोन लावून विकासाचे नाटक केले, मात्र प्रत्यक्षात ती कामे आम्ही यापूर्वीच मंजूर केली आहेत.
शहरातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवताना थोरात म्हणाले, “मागील वर्षभरात संगमनेरात अस्वस्थता वाढली आहे. शहरात ड्रग्स आणि अमली पदार्थ खुलेआम मिळत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये हाणामान्या होत आहेत. या गुंडगिरीला कोणाचे अभय आहे, हे जनतेने ओळखले पाहिजे. मंजूर झालेली रेल्वे बाहेरून जात असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र गप्प आहेत. त्यांचे लक्ष केवळ प्रत्येक कामात ‘टोल वसुली’ करण्याकडे आहे.”
यावेळी आमदार सत्यजित तांबे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, “काल उपमुख्यमंत्र्यांनी एमआयडीसी आणि रुग्णालयाच्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एमआयडीसीसाठी मी एप्रिल २०२५ मध्येच पत्र दिले होते, तर रुग्णालयाचे काम बाळासाहेब थोरातांनी २०२० मध्येच मंजूर करून ठेवले आहे. विरोधक केवळ दिशाभूल करत आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “निवडणुकीनंतर संगमनेरात एकही अनधिकृत फ्लेक्स दिसणार नाही आणि रस्ते अडवून कार्यक्रम होणार नाहीत. ‘संगमनेर २.०’ अंतर्गत शहराला पूर्ण दाबाने शुद्ध पाणी देणे, महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवणे, हा आमचा शब्द आहे.”
मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनीही विरोधकांवर निशाणा साधला. “संगमनेरचा विकास विरोधकांच्या डोळ्याला दिसत नाही. चिल्लट प्राणी गडबड करायला लागले की सिंह बाहेर येतो. समोरचे लोक ढोंगी आहेत,” असे ते म्हणाले.
या सभेत सौ. दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, इसाक खान पठाण, हिरालाल पगडाल यांचीही भाषणे झाली. सभेला महिला, युवक आणि नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती, ज्यामुळे ही सभा ऐतिहासिक ठरली