शिर्डी नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, संपूर्ण शहराचे लक्ष सध्या प्रभाग क्रमांक दोनकडे लागले आहे. ११ प्रभागांपैकी सर्वात ‘बिग हिट’ आणि चुरशीच्या ठरणाऱ्या या प्रभागात अपक्ष उमेदवार नंदू उर्फ सतिश गोविंदराव गोंदकर यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. मतदारांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता, शिर्डीत‘चहा किटली’ जिंकून इतिहास घडवणार आणि सतिश गोंदकर या निवडणुकीचे ‘जाईंटकिलर’ ठरणार, अशी चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
शिर्डीच्या विकासासाठी आणि प्रभागाच्या कायापालटासाठी उमेदवार सुशिक्षित असणे गरजेचे असते, ही मतदारांची अपेक्षा सतिश गोंदकर पूर्ण करत आहेत. त्यांनी फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले असून एक अभ्यासू तरुण म्हणून त्यांची ओळख आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर अध्यात्माची आणि सेवेची आवड असल्याने त्यांनी साई संस्थांनमध्ये अनेक वर्षे साईबाबांची सेवा केली आहे. त्यानंतर हॉटेल व्यवसायात पदार्पण करत, आपल्या कष्टाने त्यांनी एक प्रतिथयश उद्योजक म्हणून नावलौकिक मिळविला आहे. शिक्षण, सेवा आणि उद्योग या तिन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव प्रभागाच्या विकासासाठी कामी येईल, असा विश्वास मतदारांना वाटत आहे.
निवडणूक प्रचारात सतिश गोंदकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. ‘चहाची किटली’ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आता घराघरात पोहोचले आहे. विशेष म्हणजे, ही निवडणूक आता केवळ उमेदवाराची राहिलेली नसून ती खुद्द मतदारांनीच हातात घेतल्याचे चित्र आहे. प्रभागातील प्रत्येक घरातून “एक मत सतिश भाऊला” असा उत्स्फूर्त संदेश येत आहे.
सतिश गोंदकर यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील तरुण, महिला आणि जेष्ठ नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. त्यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढला असून मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. जनमत पूर्णपणे त्यांच्या बाजूने झुकल्याचे दिसून येत असल्याने, विरोधी उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. सर्वसामान्यांशी असलेली नाळ आणि विकासाचा ध्यास यामुळे सतिश गोंदकर यांच्या ‘चहा किटली’ला प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांनी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या निवडणुकीत सतिश गोंदकर हे प्रस्थापितांना धूळ चारत विजयश्री खेचून आणतील, असे चित्र निर्माण झाले आहे.