संगमनेरमध्ये सेवा समितीचाच विजय होणार; आमदार सत्यजित तांबे यांचा विश्वास
संगमनेर । झुंझार न्यूज
लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष असणे अपेक्षित असते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता निवडणूक आयोगाचा कार्यक्रम मंत्रालयातील एखादा पीए ठरवत असून आयोग केवळ त्याची अंमलबजावणी करत आहे. निवडणूक आयोग पूर्णपणे सत्ताधाऱ्यांचा गुलाम झाला आहे,” अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. दरम्यान, संगमनेरमध्ये विकासाच्या जोरावर सेवा समितीचाच विजय होईल, असा विश्वास आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला.

संगमनेर येथे मतदान प्रक्रियेदरम्यान माध्यमांशी बोलताना थोरात यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि ईव्हीएम यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. हर्षल तांबे आणि डॉ. वर्षाताई तांबे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

मंत्रालयातील ‘पीए’ ठरवतोय निवडणूक कार्यक्रम
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “देश आणि राज्यघटना टिकवण्यासाठी लोकशाहीतील मतदान प्रक्रिया अत्यंत पवित्र आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून निर्दोष कार्यक्रम जाहीर होत नाही, हे दुर्दैवी आहे. निवडणूक प्रक्रिया दोन दिवसांवर आली असताना ती अचानक स्थगित केली जाते, असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता. हा सर्व गोंधळ पाहता, निवडणूक कार्यक्रम आयोगाचे उच्चपदस्थ अधिकारी नाही, तर मंत्रालयातील कोणीतरी पीए ठरवतोय आणि आयोग तो जाहीर करतोय, असे आमचे स्पष्ट मत आहे. आयोगातील अधिकारी अनुभवी असूनही ते सध्या सत्तेच्या दबावाखाली काम करत आहेत.

ईव्हीएम आणि मतदार याद्यांबाबत साशंकता
मतदार याद्यांमधील गोंधळावर बोट ठेवताना थोरात म्हणाले की, “याद्यांमधील त्रुटींबाबत आम्ही अनेकदा दाद मागितली, दुरुस्तीची मागणी केली, पण राजकीय हस्तक्षेपामुळे साधे तहसीलदारही नीट उत्तर देत नाहीत. ईव्हीएमबाबत आणि मतदार यादीतील गोंधळाबाबत सत्ताधारी काहीही करू शकतात, हे देशाला माहित आहे. आज मतदान झाल्यानंतर तब्बल २० दिवस ईव्हीएम पेट्या तशाच पडून राहणार आहेत. या काळात काय होईल, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. त्यामुळे आज मतदान झाल्यावर उद्याच मतमोजणी झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे.

संगमनेरकर विकासाच्या पाठीशी: आ. सत्यजित तांबे
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, “लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संगमनेरमध्ये सातत्याने विकासाची कामे केली आहेत. शहरासाठी आणि तालुक्यासाठी मोठा निधी आणला आहे. संगमनेर शहर आणि तालुका हा एक परिवार असून जनतेचा आमच्यावर गाढ विश्वास आहे. त्यामुळे या निवडणुकीत सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील.

कामानेच देणार उत्तर: डॉ. मैथिलीताई तांबे
विरोधकांचा समाचार घेताना डॉ. मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, “विरोधकांचे काम केवळ आरोप करणे हेच आहे, तर आमचे काम सतत लोकांसाठी काम करत राहणे हे आहे. आम्ही काम केले आहे आणि त्याचे फळ आम्हाला नक्कीच मिळेल.
नऊ वर्षांनंतर निवडणूक; संगमनेरमध्ये मोठा उत्साह
संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर होत असल्याने शहर आणि उपनगरांमधील मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तरुण मतदारांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने या लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवला. हा उत्साह या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले आहे.
