संगमनेर । झुंजार न्यूज
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापती असे विविध पदे भूषवताना स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी सर्वांना न्याय दिला. लोकशाही आणि काँग्रेस संस्कृतीला ताकद देण्याचे काम त्यांनी आयुष्यभर केले असून त्यांच्या निधनाने देशाचे सतशील प्रामाणिक आणि पारदर्शक नेतृत्व हरपले असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबाबत यशोधन कार्यालय येथे प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वर्गीय शिवराज पाटील चाकूरकर यांनी देशाच्या लोकशाहीला ताकद देण्याचे काम आयुष्यभर केले. याचबरोबर काँग्रेस विचारसरणी जपत त्यांनी या विचारांना पाठिंबा दिला. आणि हा विचार पुढे नेण्यासाठी काम केले.
ज्या ज्या पदावर त्यांनी काम केले त्या सर्व पदांना त्यांनी अत्यंत योग्य न्याय दिला. राज्य पातळीवर विधानसभा अध्यक्ष त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यपाल असे विविध पदे भूषवताना त्यांनी सर्वांना सोबत घेऊन समाजाच्या विकासासाठी काम केले. प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत सर्वांना न्याय दिला.
त्यांचे व्यक्तिमत्व जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. लातूरचा पालकमंत्री असताना त्यांचे कामकाज जवळून पाहिले. याचबरोबर ज्या ज्या वेळेस दिल्लीला जायचो त्यावेळेस त्यांची भेट व्हायची. राजकीय सामाजिक आणि व्यक्तिगत जीवनात सुद्धा ते अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तबद्ध जीवन जगले त्यांची जीवनशैली ही सर्वांसाठी मार्गदर्शक असल्याची भावना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
![]()
तर मा.आ.डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, अभ्यासू आणि सर्वांना न्याय देणाऱ्या महाराष्ट्राच्या या सुपुत्राने राज्यात आणि देशपातळीवर काम केले. राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री, लोकसभा अध्यक्ष असे अनेक पदे भूषवताना त्यांनी समानता आणि लोकशाहीचा विचार जपला त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व्यक्तिमत्व हरपले असल्याचे भावना माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब हे लातूरचे पालकमंत्री होते. त्यावेळेस शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचा त्यांच्याशी जवळून संबंध आला. राजकारणातील अत्यंत शिस्तबद्ध,आदर्श आणि पारदर्शक जीवन जगणारे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे कार्य तरुण पिढीसाठी सदैव प्रेरणादायी असल्याच्या त्या म्हणाल्या.



