जवळे कडलग येथील घटनेची गंभीर दखल; विखे पाटील व खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

नागपूर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे चार वर्षीय बालकाचा बळी घेणाऱ्या बिबट्याची गंभीर दखल वन विभागाने घेतली आहे. या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याचे आणि तसे प्रयत्न अयशस्वी ठरल्यास त्याला ‘ठार मारण्याचे’ (Shoot at sight) आदेश नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने निर्गमित केले आहेत. राज्याचे जलसंपदापालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान वनमंत्र्यांशी भेट घेऊन केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर हे महत्त्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारी रात्री जवळे कडलग येथे ही हृदयद्रावक घटना घडली. घराजवळ खेळत असताना सिद्धेश कडलग या चार वर्षीय चिमुकल्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या दुर्दैवी घटनेत सिद्धेशला आपले प्राण गमवावे लागले. एका निष्पाप बालकाचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. “जोपर्यंत बिबट्याला ठार मारण्याची कायदेशीर परवानगी मिळत नाही, तोपर्यंत सिद्धेशचा मृतदेह ताब्यात घेणार नाही,” अशी आक्रमक भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली होती.

सध्या नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन जवळे कडलगमधील घटना आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या दहशतीचे वास्तव निदर्शनास आणून दिले.

स्थानिक पातळीवर वन अधिकाऱ्यांना पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या आणि बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे व गस्त वाढवण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. मात्र, जनक्षोभ आणि धोका लक्षात घेता, मंत्री विखे पाटील यांनी थेट प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एम. श्रीनिवास रेड्डी यांच्याशी संपर्क साधला.

 

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी आणि गरज पडल्यास त्याला ठार मारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली .

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवासरेड्डी यांनी नाशिकच्या मुख्य वनसंरक्षकांना लेखी आदेश जारी केले आहेत.
१. जवळे कडलग येथे मानवी जीवितास धोकादायक ठरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (SOP) सर्व प्रयत्न करावेत.
२. जर बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले, तर त्याला ठार मारण्यास मंजुरी देण्यात येत आहे.
३. या मोहिमेसाठी नाशिक मुख्य वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांची ‘विशेष टीम‘ तैनात करण्यात यावी.

शासनाच्या या निर्णयामुळे जवळे कडलग परिसरातील भयभीत ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला असून, वन विभागाच्या विशेष पथकाने बिबट्याचा शोध सुरू केला आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *