अहिल्यानगर । झुंझार न्यूज

राज्यात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, अहिल्यानगर महानगरपालिकेसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आघाडी घेत आपल्या पूर्वतयारीला वेग दिला आहे. या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची एक समिती गठीत करण्यात आली आहे

उमेदवार निवडीसाठी ‘ही’ समिती प्राधिकृत

आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी आणि योग्य उमेदवारांची शिफारस करण्यासाठी भाजपने खालील नेत्यांना प्राधिकृत केले आहे:
डॉ. सुजय विखे पाटील (माजी खासदार)
आ. विक्रमसिंह पाचपुते (निवडणुकीचे सहप्रभारी)
विनायकराव देशमुख (जिल्हा समन्वयक)
अनिल मोहिते (जिल्हाध्यक्ष)
दिलीप मालसिंग
नितीन दिनकर
या संदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री व निवडणुकीचे जिल्हा प्रभारी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित नेत्यांना पत्राद्वारे सूचित केले आहे.

 

महायुती एकत्रित लढणार; जानेवारीत निवडणुकीची शक्यता

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, “महानगरपालिका निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. मुंबईसह प्रमुख महापालिकांमध्ये महायुती व्हावी आणि सर्व ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवली जावी, यावर आमची सकारात्मक चर्चा झाली आहे. यासाठी प्राथमिक पातळीवर समित्या स्थापन करून निर्णय घेतले जातील.

दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी पक्षाचे राष्ट्रीय संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महानगरपालिका निवडणूक राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीतील निर्देशानुसारच अहिल्यानगरसाठी ही मुलाखत समिती गठीत करण्यात आली आहे.

अहिल्यानगर शहरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर, नियुक्त केलेल्या समितीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी आणि त्याचा सविस्तर अहवाल पक्षाकडे सादर करावा, असे निर्देश ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे दिले आहेत.

भाजपच्या या गतिमान हालचालींमुळे अहिल्यानगरमधील राजकीय वातावरण तापू लागले असून, आता तिकिटासाठी इच्छुकांची चढाओढ पहायला मिळणार आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *