विद्यार्थ्यांमध्येनेतृत्वगुण व संवादकौशल्य विकसित करण्यासाठी आनंद मेळावा प्रभावी माध्यम – पर्यवेक्षक दीपक चव्हाण
आश्वी । झुंझार न्यूज
शालेय शिक्षण हे केवळ चार भिंतींमधील पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जीवनातील कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) येथे आयोजित करण्यात आलेला ‘बाल आनंद मेळावा’ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी केवळ वस्तूंची विक्रीच केली नाही, तर व्यवहारज्ञान, संवादकौशल्य आणि नेतृत्वगुणांचे प्रत्यक्ष धडे गिरवले.
उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव
पर्यवेक्षक दीपक चव्हाण यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी बाल आनंद मेळावा हा एक अत्यंत उपयुक्त मंच आहे.” मेळाव्यात विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, विविध खाद्यपदार्थ, खेळणी आणि स्वतः बनवलेल्या हस्तकला वस्तूंची दुकाने थाटली होती. वस्तूंच्या किमती ठरवणे, ग्राहकांशी संवाद साधणे, पैशांची देवाणघेवाण आणि हिशोब ठेवणे या प्रक्रियेतून मुलांचा आत्मविश्वास वाढला व त्यांच्या सामाजिक कौशल्यात लक्षणीय भर पडली.
या मेळाव्याचे उद्घाटन स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष म्हसे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सदस्य बाळकृष्ण होडगर, सुमतिलाल गांधी, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वैभव ताजणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डी. के. वडितके, पर्यवेक्षक दीपक चव्हाण, गुरुकुल प्रमुख मोहन घिगे, ज्येष्ठ शिक्षक रमेश थेटे, अनिता गाढे, बी. एम. सहाणे, राजेंद्र बर्डे, प्रशांत वाळुंज, महारुद्र तांबे, सुवर्णा वाकचौरे, भरती बागुल, उषा घिगे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांची बोलकी प्रतिक्रिया: ‘आम्ही झालो छोटे व्यापारी’
मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सहावीतील विद्यार्थिनी वेदिका भुसाळ हिने सांगितले, “मी पहिल्यांदाच भाजीपाला विक्री केली. विशेष म्हणजे आमच्या शेतातील कोथिंबीर मी स्वतः तोडून, त्याच्या जुड्या बांधून विक्रीसाठी आणल्या होत्या. सुरुवातीला ग्राहकांशी बोलताना भीती वाटली, पण नंतर पैसे मोजताना आणि व्यवहार करताना खूप मजा आली. आज मला खऱ्या व्यापाऱ्यासारखे वाटले.” तसेच पाचवीतील आराध्या ताजणे व ज्ञानेश्वरी वाघ म्हणाल्या, “आम्ही टिकल्या, हेअर क्लिप्स आणि कानातले विकले. ग्राहकांनी जेव्हा भाव (बार्गेनिंग) करायला सुरुवात केली, तेव्हा व्यवहार कसा सांभाळावा याची खरी समज आली. असा अनुभव पुस्तकातून कधीच मिळत नाही.
शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वैभव ताजणे यांनी मेळाव्याचे कौतुक करताना म्हटले की, “हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे मुलांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवली जातात. निर्णयक्षमता आणि जबाबदारीची जाणीव मुलांमध्ये निर्माण झाल्याचे आज स्पष्ट दिसून आले.
विद्यार्थ्यांनी दुकानांची केलेली आकर्षक सजावट, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी केलेली धडपड आणि समूहाने काम (Teamwork) करण्याची वृत्ती पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले. हा आनंद मेळावा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, मनोरंजन आणि अनुभवाचा एक सुंदर संगम ठरला.