संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, आता या विषयाला राजकीय वळण लागले आहे. संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधींकडून खोटी माहिती आणि व्हिडिओ प्रसारित करून निष्पाप तरुणांचे आणि तालुक्याची बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. “आरोपी असतील त्यांना नक्की शिक्षा करा, मात्र राजकीय स्वार्थासाठी निरपराध युवकांचे व्हिडिओ बनवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करू नका. असा उद्योग यापुढे चालू ठेवल्यास तरुणांच्या प्रचंड उद्रेकाला सामोरे जावे लागेल,” असा सडेतोड इशारा व्हिडिओमध्ये नाहक गोवल्या गेलेल्या युवकांनी दिला आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारी कर्मचारी संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आणि व्हिडिओमुळे बदनामी झालेले युवक साईराज कांदळकर, सार्थक कांदळकर, अक्षय दिघे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
सध्या नागपूर अधिवेशन सुरू असताना संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधींच्या यंत्रणेमार्फत समाज माध्यमांवर काही व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. यामध्ये तळेगाव दिघे येथील काही तरुणांचा अमली पदार्थांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत स्पष्टीकरण देताना बाधित युवकांनी सांगितले की, “सदर व्हिडिओ आणि फोटो हे गणेश कारखान्याच्या निकालाच्या दिवशीचे आहेत. आम्ही नवीन ‘थार’ गाडी घेतली होती आणि तिच्या पूजनासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे गेलो होतो. त्यावेळचे हे फोटो आहेत.
या व्हायरल व्हिडिओमध्ये ‘तुषार पडवळ’ असे नाव घेऊन ज्या तरुणाला दाखवण्यात आले आहे, तो प्रत्यक्षात ‘सार्थक कांदळकर’ असल्याचे पुराव्यानिशी या पत्रकार परिषदेत दाखवून देण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या तुषार पडवळचा उल्लेख अमली पदार्थ प्रकरणात केला जातोय, तो प्रत्यक्षात अमोल खताळ यांचाच कार्यकर्ता असल्याचे व्हिडिओ पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाचे वर्णन करताना सार्थक कांदळकर भावूक झाला. तो म्हणाला, “माझ्या बहिणीचे लग्न होते, नेमक्या त्याच दिवशी हा खोटा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. लग्नाला आलेल्या नवीन पाहुण्यांनी आणि नातेवाईकांनी ‘तू गांजाचा व्यवसाय करतो की काय?’ असे प्रश्न विचारले. यामुळे माझ्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. हे माझे आयुष्य आणि सामाजिक प्रतिष्ठा उध्वस्त करण्याचे कारस्थान आहे.

साईराज कांदळकर यानेही आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही कष्टाने काम करून जगणारी मुले आहोत. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि आमच्या कुटुंबाचे आमच्यावर चांगले संस्कार आहेत. आम्ही कधीही वाईट मार्गाला गेलो नाही. कृपया अशी खोटी बदनामी थांबवा,” अशी विनंती त्याने केली.

तालुक्याची बदनामी खपवून घेणार नाही – बाबा ओहोळ
यावेळी बोलताना बाबा ओहोळ यांनी नवीन लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले, “संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. नवीन लोकप्रतिनिधींनी तालुक्यासाठी निधी आणावा, कामे करावीत, त्यांचे स्वागतच आहे. मात्र, खोटे व्हिडिओ तयार करून तालुक्याची आणि तरुणांची बदनामी करणे थांबवावे. अन्यथा संगमनेरची जनता आणि तरुण पिढी तुम्हाला माफ करणार नाही.

तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनीही, “केवळ राजकीय हेतूने फोटोचा दुरुपयोग करून तालुक्याची बदनामी करणे युवक कधीही सहन करणार नाहीत,” असा इशारा दिला. दरम्यान, सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे उपस्थित युवकांनी सांगितले.

संगमनेरच्या बदनामीचा राज्यभरातून निषेध
राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याच्या अवतीभोवती तरुणांचा गराडा असतो, हे चित्र सर्वसामान्य आहे. राजकीय नेते कधीही कार्यकर्त्यांना नाराज करत नाहीत. मात्र, अशा सामान्य भेटीगाठींचे फोटो वापरून संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी जी बदनामी चालवली आहे, ती राज्य सहन करणार नाही. लोकनेते बाळासाहेब थोरात आणि संगमनेर तालुक्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन केल्या जाणाऱ्या या टीकेचा राज्यभरातून निषेध होत असल्याचे बाबा ओहोळ यांनी यावेळी सांगितले.

