संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात छोट्या सिद्धेश कडलगचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेले त्याचे वडील सुरज कडलग आणि हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. मात्र, प्रशासन एसीमध्ये बसून आचारसंहितेचे कारण देत निवेदन स्वीकारण्यास टाळाटाळ करत होते. प्रशासनाच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात प्रचंड आक्रमक झाल्या. अखेर “आम्हाला आक्रमक व्हायला लावू नका, अन्यथा कार्यकर्ते कार्यालयात घुसतील,” असा सज्जड दम आमदार तांबे यांनी देताच प्रांताधिकारी हिंगे यांनी खाली उतरत जनतेमध्ये येऊन निवेदन स्वीकारले.

संगमनेर तालुक्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या एका वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात तब्बल १२ नागरिकांचा बळी गेला आहे, तर सातत्याने हल्ले सुरूच आहेत. या गंभीर परिस्थितीवर तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली भव्य ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये पीडित सुरज कडलग यांच्यासह तालुक्यातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, महिला, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला, मात्र प्रशासनाच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांताधिकारी खाली येण्यास तयार नव्हते. आचारसंहितेचे कारण देत त्यांनी एसी केबिनमधून बाहेर येण्यास नकार दिला. यामुळे उपस्थित जनसमुदाय आणि नेते आक्रमक झाले.

 


यावेळी प्रशासनाला ठणकावताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले, “बिबट्यांच्या दहशतमुक्तीसाठीचे हे आंदोलन राजकीय नाही, यात कुणाचाही स्वार्थ नाही. ज्यांचा मुलगा डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेला, ते सुरज कडलग आणि सर्व समाज आज न्यायासाठी एकवटला आहे. हे आंदोलन केवळ फोटोसाठी किंवा शोबाजीसाठी नाही, तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आहे. जोपर्यंत शासनाचे प्रमुख अधिकारी येत नाहीत, तोपर्यंत आम्ही जागा सोडणार नाही. माझा जन्मच आंदोलनातून झाला आहे. आम्हाला जास्त आक्रमक व्हायला लावू नका, अन्यथा कार्यकर्ते तुमच्या कार्यालयात घुसतील.”


यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी देखील प्रशासनाला खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या, “मी आज येथे एका राजकीय पक्षाची कार्यकर्ती म्हणून नाही, तर एक आई म्हणून आले आहे. ज्यांची मुले मृत झाली, त्या पालकांची काय अवस्था आहे, हे प्रशासनाने समजून घ्यायला हवे. अधिकाऱ्यांनी थोडी तरी संवेदनशीलता दाखवावी आणि जनतेमध्ये येऊन महिलांचे व पीडितांचे प्रश्न समजून घ्यावेत.


आमदार तांबे आणि डॉ. थोरात यांचा आक्रमक पवित्रा आणि हजारो नागरिकांची जोरदार घोषणाबाजी पाहून प्रशासन नरमले. प्रांताधिकारी हिंगे यांनी तातडीने खाली येत मोर्चाला सामोरे जाऊन निवेदन स्वीकारले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, प्रवीण साळुंखे तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.

…तर खपवून घेणार नाही: सत्यजीत तांबे

आम्ही बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते आहोत, आम्हाला चांगले संस्कार आहेत. अधिकाऱ्यांशी संयमाने आणि चांगले वागणे ही आमची संस्कृती आहे. मात्र, प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. प्रांताधिकारीच काय, जिल्हाधिकारी किंवा मंत्री आले तरी आम्ही हलणार नाही,” अशा शब्दांत आमदार सत्यजित तांबे यांनी प्रशासनाला इशारा दिला. त्यांचा हा आक्रमक अंदाज पाहून उपस्थित जनसमुदायाने जोरदार प्रतिसाद दिला.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *