ना. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे , विखे पाटील , जगताप यांची प्रमुख उपस्थिती
अहिल्यानगर । झुंझार न्यूज
रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि भारतीय दलित पँथरपासून सामाजिक संघर्षात अग्रभागी राहिलेले अशोक गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येत्या शुक्रवारी, ९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथे भव्य ‘श्रद्धांजली सभा’ आयोजित करण्यात आली आहे.
नगर-मनमाड रोडवरील वृंदावन लॉन येथे ही शोकसभा पार पडणार असून, यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले , पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार संग्राम जगताप , माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील , माजी मंत्री शंकरराव गडाख , रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर , प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे , प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे , जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव , जेष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड , दिपकराव गायकवाड यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून शोकसंवेदना व्यक्त करणार आहेत.
अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्व हरपले: ना. रामदास आठवले
अशोक गायकवाड यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करताना रामदास आठवले म्हणाले की, अशोक गायकवाड यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाचे एक अभ्यासू आणि संघर्षशील नेतृत्व हरपले आहे. दलित पँथरच्या काळापासून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवली. माझ्या नेतृत्वाखाली त्यांनी पँथरपासून रिपब्लिकन पक्षापर्यंत अनेक दशके निष्ठेने काम केले. त्यांची वक्तृत्वशैली आणि वैचारिक बैठक प्रगल्भ होती.
जिल्ह्यातील प्रश्नांची जाण असलेला नेता
अशोक गायकवाड हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांची त्यांना सखोल जाण होती. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी कधीही मनभेद होऊ दिले नाहीत. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणारा एक दिलदार कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती. २ ऑगस्ट रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले, ज्यामुळे आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
९ ऑगस्ट रोजी अहिल्यानगरमध्ये त्यांचा ‘जलदान विधी’ संपन्न होणार आहे. त्यानंतर आयोजित शोकसभेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले गायकवाड कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत.
अशोक गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, दोन मुली , सुन आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.