वकील संघाच्या संघर्षाला यश; कर्जतमध्ये जल्लोषाचे वातावरण

 

कर्जत । झुंझार न्यूज 

 

 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक निर्णयामुळे कर्जत येथील जिल्हा सत्र न्यायालयास अखेर मंजुरी मिळाली आहे. हा वकील संघाने केलेल्या प्रदीर्घ संघर्षाचा आणि सर्वांच्या पाठपुराव्याचा विजय आहे. या न्यायालयाच्या भव्य इमारतीसाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

मंत्री विखे पाटील यांनी नुकतीच कर्जत येथील न्यायालयात वकील संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांची सदिच्छा भेट घेतली. राज्य सरकारने कर्जतसाठी जिल्हा सत्र न्यायालय मंजूर केल्याबद्दल वकील संघाच्या वतीने ना. विखे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष संग्राम ढेरे, उपाध्यक्ष डी.जे. चव्हाण, सेक्रेटरी अविनाश मते, बाळासाहेब शिंदे, शिवाजी अनभुले यांच्यासह वकील संघाचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वकील संघाच्या आंदोलनाचे फळ


यावेळी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले की, “मी जेव्हा विधी व न्याय खात्याचा मंत्री होतो, तेव्हापासून वकील संघाने जिल्हा सत्र न्यायालयासाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. वकील संघाने यासाठी मोठा लढा दिला, आंदोलन केले आणि आज त्या आंदोलनाला यश आले आहे. विधी व न्याय विभाग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याने त्यांनी या प्रस्तावास तात्काळ मंजुरी दिली. या निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. तसेच माजी आमदार तथा सभापती राम शिंदे यांनीही या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.”

कृषी विभागाच्या जागेसाठी प्रयत्न करणार


न्यायालय इमारतीसाठी निधी देण्यासोबतच, वकिलांच्या स्वतंत्र कक्षासाठी (Advocates Chamber) कृषी विभागाची जागा मिळावी, अशी मागणी वकील संघाने केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद देत ना. विखे पाटील यांनी सांगितले की, “वकील संघाने या जागेबाबतचा प्रस्ताव सादर करावा. वकिलांच्या सुविधेसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मी स्वतः पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन.”

कर्जतला जिल्हा सत्र न्यायालय मिळाल्यामुळे आता पक्षकारांना आणि वकिलांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची गरज उरणार नाही. या निर्णयाचे कर्जत तालुक्यातून स्वागत होत आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *