सोशल मीडियासह गावांमध्ये मोठी जनजागृती
9 ऑगस्ट क्रांती दिन मोठे आंदोलन होणार
संगमनेर । झुंझार न्यूज
नाशिक – पुणे सरळ मार्गी रेल्वे व्हावी याकरता नाशिक, सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, अकोले,जुन्नर, खेड या तालुक्यांमध्ये नागरिकांमध्ये एकजूट झाली असून तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी या मागणीला पाठिंबा रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली असून सरळ रेल्वे मार्गाकरता आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनात अवघी तरुणाई एकवटली आहे. या सरळ मार्गाच्या मागणीस करता 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता मोठे आंदोलन होणार आहे.

नाशिक – पुणे रेल्वे सरळ मार्गे व्हावी याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी 2000 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. यानंतर सातत्याने केंद्रीय मंत्री महाराष्ट्र सरकार, महारेल व रेल्वे यांच्या समवेत पाठपुरावा करून विविध बैठका घेऊन हा रेल्वेमार्ग अंतिम स्तरावर पोहोचवला. 2019 मध्ये सरळ रेल्वे मार्गाकरता आरक्षण होऊन शेतकऱ्यांना सुमारे 600 कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र सरकार बदलले आणि रेल्वेचा मार्ग बदलण्यात आला. पुण्यावरून पुणतांबा असा झाला यामुळे नागरिकांमध्ये मोठा तीव्र असंतोष निर्माण झाला. सरळ रेल्वे मार्ग झाला पाहिजे या करता लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी लढा सुरू केला.
केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री महारेल यांच्याकडे पाठपुरावा सुरू झाला मात्र हा रेल्वे मार्ग नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा करण्यात आल्यामुळे सरळ रेल्वे मार्ग होणार की नाही याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या विभागाच्या विकासाकरता हा रेल्वेमार्ग अत्यंत गरजेचा असून तो झालाच पाहिजे या करता आमदार सत्यजित तांबे यांनी या महामार्गावरील सर्व लोकप्रतिनिधींच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. प्रत्येक तालुक्यातील तरुणाई एकत्र केली.
याचबरोबर सरळ रेल्वे मार्गाकरता महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे,खासदार निलेश लंके, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार शरद सोनवणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाबाजी काळे,आमदार विलास लांडे,आमदार महेश लांडगे, माजीमंत्री आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवरांनी पाठिंबा दिला आहे आणि ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आता केंद्र सरकार व महाराष्ट्राचे सरकारचे लक्ष वेधण्याकरता नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी क्रांतीदिनी सकाळी 9 वाजता सर्वत्र एकाच वेळी रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी एकाच वेळी सर्व ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात तालुक्यातील जनता सहभागी होणार असून संगमनेर तालुक्यामध्ये हिवरगाव पावसा टोल नाका येथे हे आंदोलन होणार आहे.
या आंदोलनाच्या बाबत सोशल मीडिया मधून तरुणांनी मोठी जागृती केली आहे याचबरोबर गावोगावी नागरिक एकत्र येऊन रेल्वे झालीच पाहिजे अशी आग्रही मागणी करत आहेत.यामध्ये झेन झी सुद्धा सरसवली आहे.
ज्यांनी राजकीय हेतूसाठी हा रेल्वे मार्ग बदलला. ज्यांनी संगमनेर तालुक्याचे नुकसान करत मार्ग बदलण्यासाठी पाठिंबा दिला ते लोकप्रतिनिधी आता मूग गळून गप्प आहेत. मात्र आता जनता गप्प नसून रस्त्यावर उतरणार असल्याने क्रांती दिनी रेल्वेसाठी मोठे आंदोलन होणार आहे. तरी या आंदोलनात सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाशिक – पुणे सरळ रेल्वे मार्ग संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.





