डिजिटल भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागात उच्चगती इंटरनेट सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने उभारण्यात आलेल्या जिओ फायबर प्रकल्पाच्या कामांमधील निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संगमनेर–देवगाव–पिंपरणे–शिबलापूर आणि संगमनेर–पिंपळगाव–साकूर या महत्त्वाच्या मार्गांच्या देवगाव फाटा त्रिफुली येथे जिओ फायबरचा खांब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकावर गेल्या तब्बल एक वर्षापासून कोसळलेल्या अवस्थेत पडून आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या गंभीर समस्येकडे ना सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष दिले, ना जिओ फायबरच्या संबंधित एजन्सीने. देवगाव फाटा पुणे नाशिक संभाजीनगर या ती जिल्ह्यांना जोडणारा अत्यंत वर्दळीचा त्रिफुला आहे. येथून शिबलापूर, पिंपरणे, देवगाव, पिंपळगाव देपा, साकूर, राहुरी आणि शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणी दिशादर्शक फलकावरच जिओ फायबरचा खांब कोसळल्यामुळे फलक पूर्णपणे झाकला गेला असून तो वाहनचालकांना स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या नवख्या प्रवाशांची दिशाभूल होत असून चुकीच्या मार्गावर जाण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
विशेष म्हणजे, जिओ फायबरच्या कामांना सुरुवात होऊन बराच काळ लोटला असला तरी अनेक ग्रामीण भागात अद्याप इंटरनेट सेवा सुरू झालेली नाही. सेवा सुरू नसतानाच या कामांमुळे निर्माण झालेल्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक ठिकाणी जिओ फायबरचे खांब आणि केबल महावितरणच्या वीज खांबांना, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिशादर्शक फलकांना तसेच ग्रामपंचायत कार्यालयांच्या परिसराला अडथळा ठरत असल्याची वस्तुस्थिती आहे.
” यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे देवगाव–पिंपरणे–शिबलापूर या मार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळीची झाडे, रानटी झुडपे आणि उंच वाढलेले गवत यामुळे रस्ता संकुचित झाला आहे. अनेक ठिकाणी पाइपलाइनच्या कामानंतर पडलेले खड्डे, धोकादायक कठडे आणि इतर अडथळे कायम असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, कोसळलेल्या जिओ फायबरच्या खांबाची आणि दिशादर्शक फलकाची तातडीने दुरुस्ती करणे ही संबंधित एजन्सी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी आहे. मात्र एक वर्ष उलटूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जबाबदार अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
डिजिटल भारताची संकल्पना यशस्वी करण्यासाठी उभारण्यात आलेली सुविधा नागरिकांसाठी अडचणीचे कारण ठरू नये, याची जबाबदारी संबंधित यंत्रणांनी स्वीकारणे आवश्यक आहे. देवगाव फाटा येथील कोसळलेला जिओ फायबरचा खांब तातडीने हटवून दिशादर्शक फलक पूर्ववत करावा, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडझुडपे हटवावीत, तसेच धोकादायक खड्डे आणि अडथळ्यांची दुरुस्ती करून हा मार्ग सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.”