सत्तेच्या विकेंद्रीकरणातून तरुणाला मिळाली संधी; विखे गटाच्या सदस्यांची दांडी

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी थोरात गटाचे बाळासाहेब नानासाहेब मदने यांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधी गटाकडून उपसरपंचपदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडीने पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

उपसरपंच निवडीसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा लोकनियुक्त सरपंच नामदेव किसन शिंदे होते. या सभेसाठी विखे गटाचे ६ सदस्य अनुपस्थित राहिले, ज्यामुळे थोरात गटाचा मार्ग मोकळा झाला. यावेळी थोरात गटाचे सरपंच नामदेव शिंदे, सदस्य बबनराव शिंदे, सौ. अरुणा विजय हिंगे, अभिजीत शंकर ताजणे, अझरुद्दीन सिकंदर शेख, अविनाश गिताराम गायकवाड, सौ. दर्शना संतोष ताजणे, सौ. जयश्री विजय केदारी आणि परिघा बाबासाहेब गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.सचिव म्हणून ग्रामसेवक गौतम जानेकर यांनी काम पाहिले .

२०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत युवा नेते विजयराव हिंगे यांच्या नेतृत्वाखाली थोरात गटाने सरपंचपदासह १५ पैकी ९ जागा जिंकून आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. सत्तेत असलेल्या प्रत्येक सदस्याला काम करण्याची समान संधी मिळावी, या हेतूने सत्ताधारी गटाने ‘रोटेशन’ पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यानुसार हे तिसऱ्यांदा उपसरपंचपद बदलण्यात आले असून, यावेळी एका होतकरू तरुणाच्या (बाळासाहेब मदने) हाती गावच्या विकासाची सूत्रे देण्यात आली आहेत. या निर्णयामुळे गावातील तरुणांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.

निवड बिनविरोध झाल्याची घोषणा होताच थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून एकच जल्लोष केला. यावेळी युवा नेते विजयराव हिंगे, राहुल जऱ्हाड, महेश गायकवाड, बाळकृष्ण होडगर, सुभाषराव म्हसे, सिताराम होडगर, भाऊसाहेब गायकवाड, भाऊसाहेब जऱ्हाड, बाळूजी बिहाणी, योगेश पिलगर, दाऊद शेख, बाळासाहेब जऱ्हाड, विलास गायकवाड, भाऊसाहेब ताजणे, सुरेश मदने, वेनुनाथ मदने, अस्लम शेख , संतोष ताजणे ‘ विजय केदारी , आण्णा जाधव , आण्णा खेमनर ‘ विलास मदने , सुनिल होडगर , सुधीर होडगर , अभिजीत होडगर , सागर ताजणे , कैलास शिदे , जनार्धन खेमनर  यांच्यासह ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच बाळासाहेब मदने यांचे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजीत तांबे, युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात आणि संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार याबाबत अनिश्चितता असली, तरी आश्वी हा जिल्हा परिषद गट विखे आणि थोरात या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. दोन्ही गटांचा हा बालेकिल्ला समजला जात असल्याने, ग्रामपंचायतीच्या या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed