मुंबई । झुंझार न्यूज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची महत्त्वाची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, तब्बल २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

राज्यातील २९ महापालिकांमिळून एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महिला आरक्षणावर विशेष भर देण्यात आला असून, तब्बल १ हजार ४४२ जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय सामाजिक आरक्षणाचे गणित खालीलप्रमाणे असणार आहे:

एकूण जागा: २,८६९
महिला राखीव: १,४४२
अनुसूचित जाती (SC): ३४१
अनुसूचित जमाती (ST): ३७७
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC): ७५९

 

 

 

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, निवडणूक प्रक्रिया डिसेंबर २०२५ च्या अखेरीस सुरू होऊन जानेवारी २०२६ मध्ये पूर्ण होईल.

 

उमेदवारी अर्ज भरणे: २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी: ३१ डिसेंबर २०२५
अर्ज मागे घेण्याची मुदत: ०२ जानेवारी २०२६
मतदान: १५ जानेवारी २०२६
मतमोजणी व निकाल: १६ जानेवारी २०२६

या निवडणुकांचे निकाल राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने, ऐन थंडीत आणि नाताळच्या सुट्टीत राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची चाचपणी करत असून, महिलांसाठी आणि आरक्षित प्रवर्गासाठी जागांचे मोठे प्रमाण असल्याने पक्षीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच (२०२६) या निवडणुका होत असल्याने, सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed