अहिल्यानगर । झुंझार न्यूज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाया आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहाचा सण. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. या निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केवळ मंत्री म्हणून नव्हे, तर खऱ्या अर्थाने एक ‘पालक’ आणि ‘मार्गदर्शक’ म्हणून आपली जबाबदारी पार पाडत निवडणुकीची संपूर्ण धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.

 

 

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ना. विखे पाटील यांनी विश्रांती न घेता प्रत्येक कार्यक्षेत्रात जाऊन प्रचाराचा धडाका लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांच्या बळावर लढल्या जातात. कार्यकर्त्यांचा हा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मंत्री महोदयांनी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या स्वतःच्या शिर्डी आणि राहाता मतदारसंघासह त्यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धाव घेतली आहे.

संगमनेर ते पाथर्डी… विखेंचा झंझावात

प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ना. विखे पाटील यांनी नियोजनबद्ध प्रचार केला. संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, पाथर्डी, आणि देवळाली प्रवरा यांसारख्या महत्त्वाच्या नगरपरिषदांमध्ये त्यांनी स्वतः उपस्थित राहून प्रचाराची सूत्रे हलवली. केवळ मोठ्या सभाच नव्हे, तर सामान्यांच्या प्रश्नांना भिडण्यासाठी त्यांनी प्रभागांमध्ये जाऊन पदयात्रा काढल्या आणि कॉर्नर मीटिंगच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला.
फडणवीसांच्या सोबतीने महायुतीची वज्रमूठ
जिल्ह्यात महायुतीचे बळ वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या भव्य प्रचार सभांमध्ये ना. विखे पाटील यांची सक्रिय उपस्थिती लक्षणीय ठरली. विकासाच्या मुद्द्यावर महायुतीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी या सभांमधून केले.

संघर्षातही जपले विकासाचे व्हिजन

काही ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये पेच निर्माण झाला होता, तर कुठे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही ना. विखे पाटील यांनी अत्यंत संयमी भूमिका घेतली. कोणत्याही वादात न पडता किंवा टोकाची भूमिका न घेता, त्यांनी ‘विकासाचे व्हिजन’ केंद्रस्थानी ठेवले. पक्षाने दिलेली जबाबदारी पूर्ण करतानाच त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना बळ दिले.

कार्यकर्त्यांच्या गळ्यातील ताईत

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या उत्साहाला योग्य दिशा देण्याचे काम विखे पाटील यांनी केले आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला ओढ देऊन थेट प्रभागात जाणारा नेता पाहून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. “पालकत्व जपणे यालाच म्हणतात,” अशी भावना आता जिल्ह्यात सर्वत्र उमटत आहे.

.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम या जोरावर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या निवडणुकीत आपली छाप पाडली असून, या मेहनतीचे रूपांतर विजयात होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed