संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर, सत्तेची सूत्रे हाती येताच नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी अभिनव पद्धतीने आपल्या कार्यकाळाची सुरुवात केली आहे. रॅली किंवा विजयोत्सवात न अडकता, या लोकप्रतिनिधींनी थेट ‘फील्ड’वर उतरून शहर स्वच्छतेचा संकल्प सोडला आणि संगमनेर शहरात व्यापक स्वच्छता मोहीम राबवली.
नव्या कार्यकाळाची सुरुवात संगमनेरच्या हायटेक बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात श्री दत्ताची आरती करून करण्यात आली. यावेळी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी उपस्थित राहून शहराच्या प्रगतीसाठी आणि जनसेवेसाठी आशीर्वाद घेतले. आरतीनंतर लगेचच डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी हातात झाडू घेऊन प्रत्यक्ष साफसफाईला सुरुवात केली.
संगमनेरचा हायटेक बसस्थानक परिसर आणि नाशिक-पुणे महामार्गावरील लक्ष्मी रोड हा शहराचा मुख्य भाग आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अनधिकृत फ्लेक्स आणि वाढलेल्या कचऱ्यामुळे विद्रूपीकरण झाले होते. याची गंभीर दखल घेत नव्या पदाधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळीच मोहिमेला गती दिली. ऑरेंज कॉर्नर ते बसस्थानक हा संपूर्ण मुख्य रस्ता रात्रीच्या वेळी धुऊन काढण्यात आला. त्यानंतर सकाळी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी स्वतः श्रमदान करत संपूर्ण परिसर कचरामुक्त केला.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे, नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केवळ स्वच्छता केली नाही, तर या कामात रात्रंदिवस राबणाऱ्या सफाई कामगार माता-भगिनींशी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या कष्टप्रद कामाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे त्यांनी मनापासून कौतुक केले. लोकप्रतिनिधी स्वतः झाडू घेऊन रस्त्यावर उतरल्याने सफाई कर्मचाऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
‘शहर हे एक कुटुंब’ – डॉ. मैथिली तांबे
यावेळी बोलताना नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे म्हणाल्या, “संगमनेर शहराला सुसंस्कृत राजकारणाची मोठी परंपरा आहे. हे शहर म्हणजे आमचे एक कुटुंब आहे आणि ते स्वच्छ, सुंदर ठेवणे ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. निवडणुकीतील यशानंतर जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ न देता आम्ही केवळ विकासावर आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करणार आहोत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही सदैव तत्पर राहू.
शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल आणि स्वच्छतेची ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता सातत्याने सुरू राहील, असा विश्वासही यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. संगमनेरकरांनी या ‘स्वच्छ’ सुरुवातीचे सोशल मीडिया आणि प्रत्यक्ष भेटीतून मोठे कौतुक केले आहे.