महायुतीच्या गटनेतेपदी प्रतीक्षा कोते यांची निवड !

 

 

विखे पाटील यांच्याकडून महिला सक्षमीकरणाचा संदेश

शिर्डी । झुंझार न्यूज 

शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने नगरपरिषदेवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे. नगरपरिषदेच्या राजकारणात एक महत्त्वाची घडामोडी घडली असून, महायुतीच्या नगरसेवकांच्या गटनेतेपदी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रतीक्षा किरण कोते यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदापाठोपाठ गटनेतेपदीही एका महिलेला संधी मिळाल्याने शिर्डी नगरपरिषदेत आता ‘नारीशक्ती’चा दरवळ पाहायला मिळणार आहे.

विखे पाटील कुटुंबाचा विश्वास आणि कोते कुटुंबाची निष्ठा

राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. कोते कुटुंबाचे विखे पाटील परिवाराशी आणि पक्षाशी असलेले अनेक वर्षांचे एकनिष्ठ नाते आणि प्रतीक्षा कोते यांचा सुसंस्कृत व अभ्यासू चेहरा पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. गटनेतेपदी एका उच्चशिक्षित महिलेला संधी देऊन विखे पाटील यांनी महिला सक्षमीकरणाचा कृतीशील संदेश दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

प्रतीक्षा कोते या उच्चशिक्षित असून, त्यांचे पती युवा नेते किरण कोते यांचा शिर्डी शहरात दांडगा जनसंपर्क आहे. किरण कोते यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या सामाजिक कार्याची आणि संघटन कौशल्याची ही एक प्रकारे पावतीच मानली जात आहे. प्रतीक्षा कोते यांचा अभ्यासू दृष्टिकोन आणि किरण कोते यांचे जनसंपर्क कौशल्य यांच्या समन्वयातून प्रभागाचा आणि पर्यायाने संपूर्ण शिर्डी शहराचा विकास वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

नगराध्यक्ष आणि गटनेतेपदी महिला: शिर्डीत ‘महिलाराज

शिर्डी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी नुकतीच सौ. जयश्रीताई विष्णू थोरात यांच्या रूपाने एका मागासवर्गीय महिला नेतृत्वाला संधी मिळाली आहे. त्यानंतर आता गटनेतेपदी प्रतीक्षा कोते यांची निवड झाल्याने नगरपरिषदेच्या सभागृहात महिलांचे वर्चस्व राहणार आहे. महायुतीची रणनीती ठरवण्याची आणि प्रशासनावर पकड ठेवण्याची महत्त्वाची सूत्रे आता या महिला नेतृत्वाच्या हाती असणार आहेत.

विकासाचा शब्द: काय म्हणाल्या प्रतीक्षा कोते?

निवडीनंतर आपली प्रतिक्रिया देताना नूतन गटनेत्या प्रतीक्षा कोते म्हणाल्या की, “मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो मी सार्थ ठरवेन. हे पद म्हणजे केवळ मानसन्मान नसून शिर्डीकरांच्या सेवेची मोठी संधी आहे. शहरातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणे आणि शिर्डीचा कायापालट करणे, हेच माझे मुख्य उद्दिष्ट राहील.

 

सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध: नगराध्यक्षा जयश्री थोरात

नूतन नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात यांनीही यावेळी आपला मानस व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, “विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या संधीचा उपयोग मी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्यासाठी करेन. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.

प्रतीक्षा कोते यांच्या निवडीमुळे शिर्डीतील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, शहराच्या विकासाला आता नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *