💥 थोरात-विखे गटात छुपी मोर्चेबांधणी

 

 

🌸आयारामां’मुळे निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या

आश्वी । झुंझार न्यूज

राज्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच नगर जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘जोर्वे’ जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील या दोन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारांची अलिखित नावे निश्चित केल्याची चर्चा असून, जोर्वे आणि अंभोरे या दोन्ही गणांमध्ये नावांचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

जोर्वे जिल्हा परिषद गट हा ‘ओबीसी’ (इतर मागासवर्ग) प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. तर यांतर्गत येणारा अंभोरे गण ‘सर्वसाधारण पुरुष’ आणि जोर्वे गण ‘सर्वसाधारण महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, थोरात गटाकडून शरद नाना थोरात यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे, तर विखे गटाकडून गोकूळ दिघे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. हे दोन्ही संभाव्य उमेदवार सध्या गटातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत जनसंपर्क वाढवताना दिसत आहेत.


जोर्वे गटातील सर्वात मोठी चर्चा ही शरद नाना थोरात यांची आहे. तब्बल ४० वर्षे विखे पाटील यांच्या कळपात राहून बाळासाहेब थोरातांविरुद्ध निकराने संघर्ष करणारे शरद नाना ४-५ महिन्यांपूर्वीच थोरात गटात दाखल झाले आहेत. विखे गटातून उमेदवारी मिळण्याचे संकेत मावळल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. मात्र, त्यांच्या या ‘स्वयंघोषित’ उमेदवारीमुळे थोरात गटातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये “निष्ठावंतांचे काय?” अशी दबकी चर्चा सुरू झाली आहे.


जिल्हा परिषदेसाठी दोन्ही बाजूंकडून ‘कुणबी’ उमेदवार रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंभोरे गणात ओबीसी मतांचे गणित जुळवण्यासाठी दोन्ही गटांकडून हालचाली सुरू आहेत.

विखे गटाकडून वंजारी समाजाच्या उमेदवाराची चाचपणी सुरु असल्याचे बोलले जात असून
थोरात गटाकडून धनगर समाजाला संधी देण्यास अनुकूल असल्याचे चित्र दिसत असल्याने हे समीकरण कसे जमेल हे काही दिवसातचं समजेल . तर जोर्वे गणात महिला आरक्षण असल्याने तेथे स्पर्धकांची संख्या कमी असली तरी कोल्हेवाडी आणि उंबरी बाळापूर येथील सक्रिय महिला कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

जोर्वे गटाची संपूर्ण धुरा राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या खांद्यावर आहे. नवे आणि जुने कार्यकर्ते यांचा मेळ घालण्यात आणि समन्वयाने निवडणूक लढवण्यात ते माहिर मानले जातात. जोर्वे आणि संगमनेर-शिर्डी या दोन्ही मतदारसंघांचा भाग या गटात येत असल्याने, हा विजय दोन्ही बड्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा ठरणार आहे.


एकूणच, जोर्वे गटात ‘थोरात विरुद्ध विखे’ असा पारंपरिक संघर्ष नव्या समीकरणांसह पाहायला मिळणार असून, मतदारांच्या मनात काय आहे, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.

नगरपालिकेतील विजयाचा ‘बुस्टर डोस’

 

नुकत्याच झालेल्या संगमनेर नगरपालिका निवडणुकीत थोरात-तांबे जोडीने ३० पैकी २७ जागा जिंकून आणि २ अपक्षांना सोबत घेत एकहाती सत्ता मिळवली आहे. या ‘शत-प्रतिशत’ विजयामुळे थोरात गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. या विजयाची पुनरावृत्ती जिल्हा परिषदेत करण्यासाठी थोरात गटाने कंबर कसली आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *