शिर्डी । झुंझार न्यूज

शिर्डी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने दणदणीत यश संपादन केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल २० जागांवर विजय मिळवत विखे पाटील यांनी शिर्डीच्या बालेकिल्ल्यावर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. विजयाचा जल्लोष आणि गुलालाची उधळण सुरू असतानाच, विखे पाटील यांनी गटनेते पदावर महिलेची नियुक्ती करून पहिला ‘मास्टर स्ट्रोक’ खेळला आहे. आता सर्वांच्या नजरा शिर्डीच्या ‘उपनगराध्यक्ष’ पदाकडे लागल्या असून राजकीय वर्तुळात मोठी धडधड सुरू झाली आहे.

 

गणिते आणि संख्याबळ: भाजप की मित्रपक्ष?

महायुतीच्या या महाविजयात भारतीय जनता पक्ष १४ नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. लोकशाहीच्या नियमानुसार, सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपचा या पदावर पहिला दावा मानला जात आहे. मात्र, महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना (कोते-शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (कोते-बनकर गट) यांच्याकडेही प्रत्येकी ३ प्रभावी नगरसेवक आहेत. शिर्डीच्या सत्तेत वाटा मिळावा आणि आपल्या गटाला मानाचे स्थान मिळावे, यासाठी दोन्ही मित्रपक्षांकडून अंतर्गत ‘लॉबिंग’ला सुरुवात झाली आहे.

सत्तेचे बलाबल

भारतीय जनता पक्ष: १४ जागा
शिवसेना (शिंदे गट): ०३ जागा (आशाताई कोते, बापू ठाकरे गट, सुनीता गोंदकर)
राष्ट्रवादी काँग्रेस (बनकर गट): ०३ जागा (निलेश कोते, दीपक बनकर, अलकाताई गोतीस)
अपक्ष: ०४ नगरसेवक (सतिष ऊर्फ नंदू गोंदकर, छाया पोपट शिंदे, अमित कैलास शेळके, सरिता गणेश सोनवणे)

 

 

नंदू गोंदकर यांच्या रूपाने ‘इतिहासाची पुनरावृत्ती’ होणार?

शिर्डीच्या राजकीय इतिहासात मागील पंचवार्षिक काळात विखे पाटील यांनी एक अनोखा प्रयोग केला होता. त्यावेळी अपक्ष निवडून आलेले सुजित गोंदकर यांना थेट उपनगराध्यक्ष पद देऊन सर्वांना चकित केले होते. आता पुन्हा तीच चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग २ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले नंदू गोंदकर हे विखे पाटील यांचे निष्ठावंत मानले जातात. जर विखे पाटलांनी विरोधकांना आणि अपक्षांना सन्मान देण्याची आपली जुनी रणनीती वापरली, तर नंदू गोंदकर यांच्या गळ्यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे.

सुजय विखे पाटील यांचे ‘ते’ विधान आणि अपक्षांची भूमिका

 

निवडणूक प्रचारादरम्यान माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी “जो निवडून येईल, तो आमचाच असेल” असे सूचक विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा प्रत्यय आता येत आहे. ४ अपक्ष नगरसेवकांनी आधीच विखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. यामुळे महायुतीचे संख्याबळ आता २४ पर्यंत पोहोचले आहे. शिर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक चेहरा निवडण्यावर विखे परिवाराचा भर असणार आहे.

 

विखे पाटलांचा ‘अंतिम शब्द’ ठरणार निर्णायक

उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या गोटातूनही अनेक ज्येष्ठ नगरसेवक इच्छुक आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपली फिल्डिंग लावली आहे. मात्र, राजकारणातील चाणाक्ष बुद्धिमत्तेसाठी ओळखले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील आगामी ५ वर्षांचा कार्यकाळ, नगरपरिषदेतील स्थिरता आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे समीकरण लक्षात घेऊनच आपला निर्णय घेतील.

 

विजेत्या नगरसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण असले तरी, “नामदार कोणाला संधी देतात?” या प्रश्नाने इच्छुकांची धाकधूक वाढवली आहे. शिर्डीचा नवा ‘उप’ भाजपचा असेल, मित्रपक्षाचा की पुन्हा एखाद्या अपक्ष नगरसेवकाच्या रूपाने विखे पाटील नवा ‘मास्टर स्ट्रोक’ खेळतील, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *