लोणी : झुंझार न्यूज

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीत अनेक महापुरुषांचे योगदान लाभले आहे. शिक्षण क्षेत्रात महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, आरोग्य क्षेत्रात डॉ. रजनीकांत आरोळे, डॉ. बाबा आमटे आणि सहकार क्षेत्रात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी क्रांती घडवून आणली. याच क्रांतीचा वारसा समर्थपणे पुढे नेऊन ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलण्याचे ऐतिहासिक कार्य ‘पद्मभूषण’ डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केले. ग्रामीण परिवर्तनाचे खऱ्या अर्थाने ते आधुनिक शिल्पकार ठरले आहेत.

वारसा संघर्षाचा आणि कतृत्वाचा

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून सामान्य शेतकऱ्याला सन्मानाने जगायला शिकवले. हाच वारसा बाळासाहेब विखे पाटील यांनी अधिक व्यापक केला. सहकारी साखर कारखाना हे केवळ साखर उत्पादनाचे केंद्र नसून ते ‘ग्रामीण परिवर्तनाचे केंद्र’ असावे, हा त्यांचा मुख्य विचार होता. केवळ आर्थिक सुबत्ता म्हणजे विकास नव्हे, तर ग्रामीण भागातील प्रत्येक माणसाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले.

जनसामान्यांशी घट्ट नाळ

खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची नाळ लहानपणापासूनच मातीशी जोडलेली होती. शेतात राबणे, इंजिन दुरुस्ती करणे, अगदी मेंढपाळांसोबत राहणे अशा अनुभवातून ते घडले. त्यामुळेच त्यांना ग्रामीण भागातील दारिद्र्याची नेमकी कारणे ठाऊक होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी डोंगराळ भागातील शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देण्याचा धाडसी निर्णय घेतला, ज्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण शिक्षणावर झाला.

शिक्षण क्षेत्रातील ‘प्रवरा’ पॅटर्न

ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी ‘शिक्षण’ हेच एकमेव शस्त्र आहे, यावर त्यांचा विश्वास होता. त्यातूनच त्यांनी ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’चा विस्तार केला. १९८० मध्ये राज्याच्या विनाअनुदानित धोरणाचा फायदा घेत त्यांनी लोणी येथे राज्यातील पहिले ‘विनाअनुदानित पॉलिटेक्निक’ सुरू केले. आज या संस्थेच्या माध्यमातून बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या (KG to PG) सर्व सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध आहेत.


विशेष उपक्रम:

शाळा आणि महाविद्यालयांचे जाळे: ७ प्राथमिक, ३५ माध्यमिक, १५ कनिष्ठ आणि ६ वरिष्ठ महाविद्यालये आज कार्यरत आहेत.
तंत्रशिक्षण: अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि आयटीआय (ITI) द्वारे कुशल कारागीर घडवण्यावर त्यांनी भर दिला.
फी सवलत योजना: शेतकऱ्यांकडे फी भरण्यासाठी पैसे नसल्यास, उसाच्या पेमेंटमधून टप्प्याटप्प्याने फी कपात करण्याची सोय त्यांनी केली, जेणेकरून पैशाअभावी कोणाचेही शिक्षण थांबू नये.


आरोग्य क्षेत्रातील क्रांती

ग्रामीण जनतेला शहरासारख्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी ‘प्रवरा मेडिकल ट्रस्ट’ची स्थापना केली. आज या माध्यमातून उभारलेले अद्ययावत रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज एका मोठ्या विद्यापीठात (Deemed University) रूपांतरित झाले आहे. ० ते १२ वयोगटातील बालकांसाठी आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी मोफत उपचारांची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली. आज सुमारे ४०,००० विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात ज्ञानार्जन करत आहेत.

महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा

मुलींनी शिकले तरच कुटुंब आणि समाज प्रगत होईल, हे ओळखून साहेबांनी मुलींच्या शिक्षणासाठी स्वतंत्र कन्या शाळा, वसतिगृहे आणि पॉलिटेक्निक कॉलेजची निर्मिती केली. सुरक्षा आणि दर्जेदार शिक्षण यामुळेच आज राज्यभरातील पालक आपल्या मुलींना विश्वासाने प्रवरेत शिक्षणासाठी पाठवतात.


राजकारण: समाजकारणाचे माध्यम

३८ वर्षांहून अधिक काळ खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून काम करताना बाळासाहेब विखे पाटील यांनी आपला दबदबा निर्माण केला. मात्र, या सत्तेचा वापर त्यांनी केवळ ग्रामीण विकासासाठी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ‘कर्जमाफी’चा विचार मांडून सरकारला उपाययोजना सुचवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. प्रवरा अभ्यास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी देशातील आणि राज्यातील प्रश्नांवर नेहमीच प्रभावी तोडगे सुचवले.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत, तर ग्रामीण भागातील पिढ्यानपिढ्यांचे भविष्य उज्ज्वल केले. आज प्रत्येक घरात दिसणारा इंजिनिअर, डॉक्टर किंवा यशस्वी उद्योजक ही साहेबांनी पाहिलेल्या ग्रामीण परिवर्तनाच्या स्वप्नाची फलश्रुती आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णक्षरांनी कोरले जाईल, यात शंका नाही.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *