विधी महाविद्यालय ते एकता चौक रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

संगमनेर । झुंझार न्यूज

दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने ठेकेदाराने या रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करावी. निधी आपण उपलब्ध करून देतो; मात्र रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास बदनामी लोकप्रतिनिधींची होते. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार झाले पाहिजे दर्जाबाबत अजिबात तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशी तंबी आमदार अमोल खताळ यांनी ठेकेदाराला दिली

संगमनेर विधी महाविद्यालय ते एकता चौक हा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खराब झाला होता. या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी आमदार खताळ यांच्या माध्यमातून ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ आमदार खताळ आणि स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कैलास काशिद, संजय पानसरे, स्वरूप राऊत, शिवाजी दुशिंग प्रा. डॉ. अशोक लिंबेकर प्रा. प्रवीण रत्नपारखी, प्रा. संजय दळवी संदीप गुंजाळ, रोशन कोथमिरे, सिताराम पानसरे, विलास राऊत, स्वप्नील राऊत, तुषार राऊत, वैशाली राऊत, सारंग पानसरे, शरद पानसरे, ॲड. गोरक्ष कापकर, सचिन फटांगरे, सुरेश ढोकरे, नंदकुमार देशपांडे विशाल पावसे, निखिल शेळके, मुन्ना पुंड, रवी म्हस्के, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, शशांक नामन, भैय्या सातपुते, युवराज सातपुते, अक्षय वर्पे, दिपाली वाव्हळ, राहूल भोईर यांच्यासह शिवसेना महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


आमदार खताळ म्हणाले की, साडेतीन ते चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र, त्याच वेळी कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे आपल्या निदर्शनास आले होते. त्यानंतर रस्त्यावर खड्डे पडू लागले, तरीही अपेक्षित दुरुस्ती झाली नाही. रस्त्याच्या दोषनिवारण कालावधीतच संबंधित ठेकेदाराकडून दुरुस्ती करून घेतली असती, तर नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागला नसता. या रस्त्यावरून अनेक शाळांच्या बस, दूध उत्पादक शेतकरी, नागरिक तसेच शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करतात. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था ही केवळ वाहतुकीची समस्या नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित बाब आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, कोणतेही विकासकाम करताना पारदर्शकता आणि गुणवत्ता या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

रस्त्याच्या कामाबाबत काही जणांनी समाजमाध्यमांवर चुकीच्या पोस्ट टाकल्याचा उल्लेखही त्यांनी केला. विकासकामांसाठी निधी मिळवताना प्रत्यक्षात किती प्रयत्न करावे लागतात, याची जाणीव असणे आवश्यक आहे. सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि इतर विकासकामांच्या गरजा लक्षात घेता निधी उपलब्ध करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मात्र, अडचणींवर मात करून तालुक्यातील विकासकामांना गती देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे.

घुलेवाडी परिसरातील सध्याच्या रस्त्यापुरतेच मर्यादित न राहता साई श्रद्धा चौकातून पुढे जाणारा रस्ता तसेच समनापूरपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा आपला विचार आहे. या कामांसाठी काही बाबी टप्प्याटप्प्याने पूर्ण कराव्या लागतील. मात्र, भविष्यातील वाहतूक आणि वाढती लोकवस्ती लक्षात घेऊन रस्त्यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. शहरालगतच्या या भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली असून, शाळा, महाविद्यालये आणि दैनंदिन व्यवसायानिमित्त नागरिकांची ये-जा वाढली आहे. त्यामुळे पुढील पाच ते दहा वर्षांचा विचार करून मूलभूत सुविधांचे नियोजन होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

घुलेवाडीचा पाणीप्रश्न सोडविण्याचा निर्धार

 

रस्त्याबरोबरच घुलेवाडी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर आहे. शहरालगत असलेल्या या परिसराला पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी यापूर्वीच नियोजन होणे अपेक्षित होते. मात्र, पाण्याच्या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष दिले गेले नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणी साठवणुकीच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करताना आमदार खताळ म्हणाले की, संबंधित योजनेची कामे अपेक्षित गतीने पूर्ण झाली पाहिजेत. केवळ पाईपलाइन टाकणे किंवा बिले काढण्यापुरती कामे मर्यादित न राहता पाणी साठवणुकीची व्यवस्था वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे.

.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *