पारेगाव बुद्रुक येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ २ कोटी १५ लाखाच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर तालुक्यात शिवसेनेच्या शाखांचे जाळे विस्तारण्यावर भर देण्यात येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक, नवे कार्यकर्ते आणि आगामी काळात पक्षात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना गावपातळीवर काम करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि सदस्यांनी केवळ पदापुरते मर्यादित न राहता गावातील नागरिकांच्या अडी अडचणी समजून घ्याव्यात.तसेच गावोगावी सुरू होणाऱ्या शिवसेना शाखांच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.
तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ तसेच २ कोटी १५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ शिव सैनिक सूर्यभान गडाख, शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष सुरेश दळवी, माजी उपसरपंच कैलास गोर्डे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब गडाख, हरीश चकोर, संपत फड, डॉ. संतोष डांगे, सौरभ देशमुख, सुशील शेवाळे, दीपाली वाव्हळ, रोहिणी दळवी, शाखाप्रमुख बाबासाहेब गोर्डे, कार्याध्यक्ष आकाश गडाख, सुखदेव गडाख, सचिव किशोर गडाख, उप शाखाप्रमुख शरद गडाख, स्वप्निल गडाख, निलेश गडाख खजिनदार सुनील वाकचौरे, यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आमदार खताळ म्हणाले की, तालुक्यात गावोगावी शिवसेना शाखा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. ‘गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक’ या संकल्पनेतून शाखा पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मला आमदारकी दिली आहे, ती केवळ मिरवण्यासाठी नव्हे, तर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दिली आहे. आपण विकासकामे मंजूर करून आणतो; मात्र काही जण हा निधी आपणच आणल्याचा खोटा दावा करतात. प्रत्यक्षात हा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे श्रेयवादात न अडकता गावांच्या विकासासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. विकासकामांच्या भूमिपूजनावेळी पहिला नारळ गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते, तर शेवटचा नारळ आमदारांच्या हस्ते फोडण्याची परंपरा आपण संगमनेरमध्ये सुरू केली आहे. लोकप्रतिनिधींपेक्षा सामान्य नागरिकांना सन्मान देणे महत्त्वाचे आहे.
गेल्या ४० वर्षांपासून केवळ पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढविल्या गेल्या; मात्र या भागातील पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. भोजापूर चारीची ओळख केवळ निवडणुकीपुरती मर्यादित राहिली होती. मात्र, आपण ही ओळख पुसून काढली असून, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भोजापूर चारीसाठी ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता या चारीचे रुंदीकरण करण्याची मागणी पुढे आली आहे. यासंदर्भात जलसंपदामंत्र्यांशी चर्चा झाली असून, लवकरच मुंबई, अहिल्यानगर किंवा संगमनेर येथे बैठक आयोजित केली जाणार आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्षात पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, यासाठी प्रयत्न करणार आहे.
निळवंडे प्रकल्पामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील क्षेत्र सिंचनाखाली आले असते, तर त्याचे निश्चितच स्वागत केले असते. मात्र, काही गावांपर्यंत पाणी पोहोचले नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पाण्याच्या प्रश्नावर गावागावांत राजकारण करण्याऐवजी पाणी कसे उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवून या भागातील जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण करणार आहे. तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शिवसेना-महायुतीच्या जनसंपर्क कार्यालयात स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे. या कक्षासाठी पूर्णवेळ स्वतंत्र व्यक्तीची नियुक्ती केली जाणार असून, त्यामाध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तेथे शासकीय टँकर पोहोचत नसल्यास संबंधित यंत्रणेशी समन्वय साधला जाईल. तसेच वैयक्तिक खर्चातून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करून दुष्काळात शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. निसर्ग आपल्या हातात नसला, तरी पाण्याचा काटकसरीने वापर, वृक्षसंवर्धन आणि जलसंधारणाच्या माध्यमातून भविष्यातील संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत. दुष्काळाच्या काळात प्रत्येक शिवसैनिकाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि मदतीसाठी पुढाकार घ्यावा.
— अमोल खताळ, आमदार
शिवसैनिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्नशील : विठ्ठल घोरपडे
अनेक वर्षांपासून तालुक्यातील अन्यायकारक परिस्थिती विरोधात कार्यकर्त्यांनी संघर्ष केला आणि त्याला यश मिळाले. भाजप आणि शिवसेना यांच्यात भेदभाव न करता दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे काम करावे. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांवर शिवसेनेच्या शाखाप्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत,