मुंबई । झुंझार न्यूज
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता खऱ्या अर्थाने उडू लागला असून, मुलुंड प्रभाग क्रमांक १०४ मध्ये रिपब्लिकन पक्षाने आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार आयु. विनोद जाधव यांच्या प्रचारासाठी चक्क केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले हे स्वतः मैदानात उतरले. त्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीने संपूर्ण मुलुंड परिसर निनादून गेला असून, रिपाइंच्या विजयाचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी आयोजित सभेत आणि रॅली दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विनोद जाधव यांना मोठ्या बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. आठवले म्हणाले की, “विनोद जाधव हे केवळ राजकारणी नसून ते तळागाळातील जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढणारे एक तरुण आणि तडफदार नेतृत्व आहे. प्रभागाचा रखडलेला विकास आणि सर्वसामान्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांच्यासारखा अभ्यासू उमेदवार महापालिकेत जाणे काळाची गरज आहे.” यावेळी त्यांनी ‘कप-बशी’ या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत नागरिकांना भरघोस मतदान करण्याचे आवाहन केले.
या प्रचार रॅलीत रिपब्लिकन पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतमभाऊ सोनवणे, पालघर-ठाणे प्रभारी प्रमुख नेते सुरेश बारशिंगे, जिल्हाध्यक्ष अजित रणदिवे, राष्ट्रीय नेत्या शीलाताई अनिल गांगुर्डे, विद्यार्थी संघटनेचे नेते चंद्रशेखरजी कांबळे, देवेंद्र रणपिसे यांच्यासह पक्षाचे अनेक जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी उपस्थित होते.
रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. निळ्या निशाणांच्या जयघोषात आणि ‘आठवले साहेब पुढे चला, आम्ही तुमच्या सोबत आहोत’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ठिकठिकाणी स्थानिकांनी विनोद जाधव आणि रामदास आठवले यांचे स्वागत केले.
प्रचार रॅलीची सांगता करताना नामदार आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, “कार्यकर्त्यांचा हा अभूतपूर्व उत्साह आणि जनतेचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक १०४ मध्ये रिपब्लिकन पक्षाचा झेंडा नक्कीच फडकेल आणि विनोद जाधव यांचा विजय निश्चित आहे, याची मला पूर्ण खात्री आहे.”

या रॅलीमुळे मुलुंडमधील राजकीय वातावरण तापले असून, विनोद जाधव यांच्या उमेदवारीने अन्य पक्षांसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.




