संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे परिसरात उद्यापासून कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची पर्वणी उरणार आहे. शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ‘भव्य कळस कृषी व डेअरी प्रदर्शना’चे दिमाखदार उद्घाटन संपन्न होणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे माजी महसूल व कृषी मंत्री, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार असून, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात , संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मोठी संधी हे कृषी प्रदर्शन ९ जानेवारी ते १३ जानेवारी २०२५ या कालावधीत सर्वांसाठी खुले राहणार आहे. वेल्हाळे परिसरातील ‘शान कार’ जवळ असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात हे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती अवजारे, बी-बियाणे, खते, कीटकनाशके तसेच दुग्ध व्यवसायातील नवनवीन यंत्रसामग्री आणि प्रक्रिया उद्योगांची माहिती देणारे विविध स्टॉल्स असणार आहे
‘कळस कृषी व डेअरी प्रदर्शन’ हे केवळ शेतीपुरते मर्यादित नसून, दुग्धव्यवसाय करणाऱ्या पशुपालकांसाठीही मार्गदर्शक ठरणार आहे. जनावरांचे व्यवस्थापन, दुग्ध उत्पादन वाढीसाठीचे तंत्रज्ञान आणि चारा व्यवस्थापन यावर या प्रदर्शनात भर देण्यात आला आहे.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख एकाच छताखाली होणार आहे. तरी संगमनेर तालुका आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी, पशुपालकांनी आणि युवकांनी या उद्घाटन सोहळ्याला आणि पाच दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.